
स्थैर्य, फलटण, दि. १५ एप्रिल : शहरातील प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या हक्काचे आणि पक्के घर मिळावे, या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०’ अंतर्गत फलटण शहरासाठी शासनाकडून तब्बल १२३० घरकुलांचे मोठे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शहरात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, जास्तीत जास्त गरजू व इच्छुक नागरिकांनी या घरकुल योजनेचा लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन फलटण नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि मुख्याधिकारी निखील जाधव यांनी केले आहे.
९९ घरकुलांना मंजुरी आणि ३५ लाखांचे अनुदान वाटप
‘प्रधानमंत्री आवास योजना २.०’ अंतर्गत ‘लाभार्थी नेतृत्व बांधकाम’ (BLC) या घटकांतर्गत फलटण नगरपरिषदेकडे आतापर्यंत २१० नागरिकांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ९९ घरकुलांना भारत सरकारच्या ‘गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाकडून’ तत्परतेने मंजुरी मिळाली आहे. विशेष म्हणजे, या मंजूर घरकुलांच्या लाभधारकांना आतापर्यंत एकूण ३५ लक्ष रुपयांच्या अनुदानाचे वाटपही करण्यात आले असून, शहरात घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत.
१२३० घरकुलांचे उद्दिष्ट; कक्षास भेट देण्याचे आवाहन
या योजनेअंतर्गत फलटण शहरासाठी शासनातर्फे एकूण १२३० घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले असल्याने, अजूनही अनेक गरजू नागरिकांना या योजनेचा लाभ मिळण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, यासाठी नगरपालिकेतर्फे प्रोत्साहन दिले जात आहे.
सदर योजनेचे निकष, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांनी फलटण नगरपरिषदेतील ‘प्रधानमंत्री आवास योजना कक्षास’ (PMAY Cell) प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
