ऐतिहासिक मंगळवार तळ्याची पाणीपातळी खालावली; साताऱ्याचा पारा ४१ अंशांवर, शहरात पाणीकपातीचा फतवा


वाढत्या उन्हाळ्याचा फटका सातारा शहराला बसू लागला असून, तापमान ४१ अंशांवर गेल्याने ऐतिहासिक मंगळवार तळ्याची पाणीपातळी खालावली आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेने शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात जाहीर केली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १५ एप्रिल : कडक उन्हाळ्यामुळे आणि वाढत्या तापमानाचा फटका आता मुख्य जलस्रोत असणाऱ्या विहिरी आणि तलावांनाही बसू लागला आहे. सातारा शहराचे तापमान तब्बल ४१ अंशांवर पोहोचल्यामुळे, शहरातील मंगळवार पेठेतील ऐतिहासिक शाहूकालीन ‘मंगळवार तळ्याची’ पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर खालावली आहे.

कारंजे बंद ठेवण्याची वेळ

पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाल्यामुळे तळ्याचे सुशोभीकरण वाढवणारे कारंजे सध्या बंद ठेवण्यात आले आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच ऐतिहासिक जलस्रोतांची ही अवस्था झाल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

पालिकेचा पाणीकपातीचा निर्णय

पाणीटंचाईचे हे संकट वाढू लागल्याने सातारा नगरपालिकेनेही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सातारा शहरात विविध प्रभागांतून पाणीटंचाई जाणवू लागल्याने पालिकेने पाणीकपातीचा फतवा काढला आहे.

पालिकेने जारी केलेल्या नवीन नोटीसनुसार, सातारा शहरात आता आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे. जलस्रोतांमधील पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

पुढील अडीच महिने आव्हानात्मक

एप्रिल महिन्याच्या मध्यावरच तापमानाने ४१ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. अशा परिस्थितीत उन्हाळ्याचे उर्वरित पुढील अडीच महिने सातारकर नागरिकांसाठी अत्यंत असहाय करणारे आणि कठीण ठरणार, हेच यावरून स्पष्ट दिसून येत आहे. नागरिकांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करणे आता गरजेचे बनले आहे.

(छायाचित्र: अतुल देशपांडे, सातारा)


Back to top button
Don`t copy text!