
स्थैर्य, नागठाणे, दि.१३: कुटुंबातील महिलेस काहीतरी बोलला या संशयावरून आसनगाव (ता.सातारा) येथील दीपक हणमंत पवार (वय 27) याला मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी येथीलच एकाच कुटुंबातील तिघांविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. संपत आण्णा पवार, महेश संपत पवार व गणेश संपत पवार (सर्व रा. आसनगाव, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सोमवारी सकाळी दीपक पवार याने गावातीलच आरसड नावाच्या शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची उघडकीस आले होते. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री आसनगाव येथील दीपक हणमंत पवार या युवकाला घरातील महिलेस काहीतरी बोलला या संशयावरून गावातील संपत आण्णा पवार, महेश संपत पवार व गणेश संपत पवार यांनी प्रथम गावात व त्यानंतर गावाबाहेरील माळावर नेऊन लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या दिपकचा छोटा भाऊ सोनू पवार, चुलता शंकर साहेबराव पवार तसेच सरपंच मनोज गायकवाड, रामचंद्र पवार यांनाही दमदाटी व मारहाण केली.
यावेळी दिपकला ‘उद्या तुला गावाच्या समोर मारतो’ अशी धमकी देऊन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले, अशी फिर्याद चुलते शंकर साहेबराव पवार यांनी मंगळवारी रात्री उशिरा बोरगाव पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी संपत आण्णा पवार, महेश संपत पवार व गणेश संपत पवार यांच्याविरोधात मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल के ला. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि डॉ. सागर वाघ करत आहेत.