साताऱ्यात रानमेव्याची आवक; मंगळवार पेठेत कोकम, जांभळे, करवंदांची विक्री


स्थैर्य, सातारा, दि. २ जून : सातारा शहरातील मंगळवार पेठेतील विठ्ठल मंदिराजवळील पिंपळाच्या परिसरात कोकम, जांभळे, करवंद आणि आळवं अशा विविध प्रकारच्या रानमेव्याची मोठी आवक झाली आहे. ग्रामीण भागातून अनेक वृद्ध महिला हा रानमेवा विक्रीसाठी घेऊन येत असून, नागरिकांना या रानमेव्याची चव चाखण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

कास, यवतेश्वर, बामणोली आणि चाळकेवाडी यांसारख्या परिसराच्या डोंगररांगांमधून हा ताजा रानमेवा साताऱ्यात विक्रीसाठी येत आहे. बाजारात प्रामुख्याने लहान आणि मोठ्या आकाराच्या टपोऱ्या जांभळांना ग्राहकांची पसंती मिळत आहे.

या रानमेव्याची विक्री ग्रामीण भागातील महिलांकडून केली जात आहे. ४० ते ५० रुपये पावशेर या दराने तसेच ‘चिपटे’ आणि ‘मापटे’ या जुन्या पारंपरिक वजनी मापांचा वापर करून या फळांची विक्री केली जात आहे.

हा रानमेवा शहरात विक्रीसाठी आणताना या वृद्ध महिलांना एसटी आणि खाजगी वाहनांच्या प्रवासासाठी दोनशे रुपयांहून अधिक खर्च करावा लागतो. वाढता प्रवास खर्च परवडत नसतानाही त्या हा रानमेवा घेऊन साताऱ्यात येत आहेत. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून नागरिकांनी हा रानमेवा आवर्जून खरेदी करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

(छायाचित्र : अतुल देशपांडे)


Back to top button
Don`t copy text!