७४ वा स्वतंत्रदिन फलटण शहर व तालुक्यात उत्साहात साजरा


स्थैर्य, फलटण : भारतीय स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापनदिन फलटण शहर व तालुक्यातील विविध सहकारी, सामाजिक, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालयांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ अधिकारगृह इमारतीमध्ये प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्य सैनिक व शहीद जवानांच्या पत्नी, कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. 

कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्नशील असलेले शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, स्वयंसेवी संस्था, व्यापारी, उद्योजक यांचा शासनाच्यावतीने सन्मान करण्यात आला. पोलीस दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी आ. दीपक चव्हाण, प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील, महसूल नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश नामदे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत, गटविकास अधिकारी सौ. गावडे, विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था व सहकारी संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रध्वज वंदनाचे कार्यक्रम मर्यादित लोकांच्या उपस्थितीत करण्यात आले. फलटण नगरपरिषद व शिक्षण मंडळाच्यावतीने नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, अधिकारी, कर्मचारी व शहरवासीय उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटणच्या मुख्य कार्यालयातील ध्वजारोहण चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्हा. चेअरमन भगवानराव होळकर, संचालक, सचिव शंकरराव सोनवलकर, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी व शेतकरी उपस्थित होते. श्रीराम सहकारी साखर कारखान्यामध्ये संचालक शरदराव रणवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अध्यक्षस्थानी चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे होते. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन नितीन भोसले, संचालक, कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर, अधिकारी, कर्मचारी व श्रीराम जवाहरचे प्रोजेक्ट मॅनेजर मानसिंग पाटील उपस्थित होते. 

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालयात संस्थेचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व कर्मचारी उपस्थित होते. फलटण एज्युकेशन सोसायटी व मुधोजी हायस्कूलमध्ये सोसायटीच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, अधीक्षक श्रीकांत फडतरे, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य कांतीलाल खुरंगे, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

श्रीराम एज्युकेशन सोसायटीमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष बी. एम. मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मानद सचिव सचिन सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सूर्यवंशी (बेडके), सतीश पटवर्धन, शिवाजीराव सूर्यवंशी (बेडके), पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघात चेअरमन धनंजय पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संघाचे व्हा. चेअरमन माधवराव चव्हाण, संचालक, प्रभारी व्यवस्थापक तुकाराम नलवडे (पाटील), अधिकारी, कर्मचारी व दूध उत्पादक उपस्थित होते. राज्य परिवहन महामंडळाच्या फलटण आगारातील ध्वजारोहण प्रभारी आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निरीक्षक दत्तात्रय महानवर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, धीरज अहिवळे, वरिष्ठ लिपिक पंकज वाघमारे, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

भगवानमामा कराडकर प्रतिष्ठान संचलित राष्ट्रबंधू राजीव दीक्षित विद्यालय, पवारवाडी (पिंप्रद) येथे युवक मित्र ह.भ.प. बंडा महाराज कर्‍हाडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रशाळेच्या मुख्याध्यापिका, त्यांचे सहकारी, अधिकारी व शिक्षक उपस्थित होते. तालुक्यातील सहकारी संस्था, ग्रामपंचायती, विकास सोसायट्यांमध्ये सरपंच, चेअरमन, संबंधित पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!