सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा 600 शेतकऱ्यांनी घेतला लाभ


 

योजनेचा लाभ घेण्याचे अधीक्षक अभियंता पडळकर यांचे आवाहन

स्थैर्य, सोलापूर, दि.19 : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासन विविध योजना आणत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळण्यासाठीही शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेताला पाणी द्यायला लागते. हे काम दिवसाही करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना शासनाने आणली आहे. याचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील 600 शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांची पडळकर यांनी माहिती दिली.  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढावे, त्यांचा कृषीपंपाच्या खर्चात बचत व्हावी, रात्री-अपरात्री शेतावर जावे लागू नये, दिवसा वीज पुरवठा देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत सौर कृषीपंप उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिल्ह्यात 7376 शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. 2204 शेतकऱ्यांना मंजूरी देऊन त्यांना वीज वितरण कंपनीकडून कोटेशन देण्यात आली आहेत. या योजनेसाठी महावितरण कंपनीच्या उपकेंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या 8 जागांमध्ये व शासकीय दोन जागांवर एकूण 2580 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यातील महावितरण कंपनीच्या उपलब्ध जागेतील 3.01 मेगावॅट क्षमतेचे चार प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित प्रकल्पाचे कामही सुरू आहे. शासकीय दोन जागांवरील 20 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाचे कामही सुरू असल्याचे पडळकर यांनी सांगितले.

वीजपुरवठा सुरळित करण्याचे ध्येय

जिल्ह्यातील ग्राहकांना वीजपुरवठा सुरळित करण्यासाठी महापारेषण कार्यशिल आहे. महापारेषण कंपनीचे 31 अति उच्चदाब उपकेंद्र आहेत. यांची स्थापित क्षमता 2550 एमव्हीए (मेगा वोल्ट अँपिअर) आहे. महावितरण कंपनीचे 33/11 केव्हीएची एकूण 261 उपकेंद्र असून त्यांची स्थापित क्षमता 2357 एमव्हीए इतकी आहे.

जिल्ह्यातील ग्राहक स्थिती

जिल्ह्यात एकूण 10 लाख 41 हजार 19 वीज ग्राहक असून यामध्ये 5 लाख 98 हजार 121 घरगुती, 3 लाख 56 हजार 393 कृषीपंप, 65 हजार 387 वाणिज्यिक, 11 हजार 554 औद्योगिक, 9564 इतर असे ग्राहक आहेत. सन 2019-20 या कालावधीत जिल्ह्यात 37 हजार 746 ग्राहकांना वीज जोडण्या देण्यात आल्या असून यामध्ये सर्वात जास्त 27 हजार 293 घरगुती, 5656 कृषीपंप, 3277 वाणिज्यिक, 612 औद्योगिक आणि 908 इतर अशा वीज जोडण्या आहेत.

जिल्ह्यात कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी 184.92 कोटी रूपयांची उच्चदाब वितरण प्रणाली मंजूर आहे. या आराखड्यात 5413 वितरण रोहित्रे, 1350.74 कि.मी. उच्चदाब वाहिनी आणि 5168 वीज जोडणींची कामे पूर्ण झाली  असल्याची माहितीही त्यांनी दिली.

महावितरणही ऑनलाईन

महावितरण आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत अशा सेवाही वीज ग्राहकांना देत आहे. लघुदाब ग्राहकांसाठी  www.mahadiscom.in  या संकेतस्थळावर मुदतीत व मुदतीनंतरही वीजबील ऑनलाईन भरता येते. इंग्रजी व मराठीमध्ये मोबाईल ॲप तयार केले आहे, याद्वारे उच्च व लघुदाब वीज जोडणीची मागणी ऑनलाईन करता येते. महावितरणमधील सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली असून एसएमएसद्वारे ग्राहकांना माहिती देण्यात येत आहे.

तसेच सर्व ग्राहक मोबाईलशी जोडण्यात आल्याने वीज बिलाचा तपशील, बील भरण्याचा अंतिम दिनांक, वीज बंद असल्याचा कालावधी, देखभाल व दुरूस्तीचा कालावधी याचीही माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांना देण्यात येत आहे. मोबाईल ॲपद्वारे मीटर रिडींग घेण्याची सुविधा असून पर्यावरणपूरक गो-ग्रीन संकल्पनेतून कागदाऐवजी इमेलद्वारे वीज देयके मिळविण्याचा पर्याय आहे. यासाठी ग्राहकांना दरमहा तीन रूपयांची सूट देण्यात येत असल्याचे पडळकर यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!