

सातारा जिल्ह्यात पावसाळा तोंडावर आला असला तरी वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. सध्या जिल्ह्यातील ८९ गावे आणि २८३ वाड्या-वस्त्यांमधील १ लाख १४ हजारांहून अधिक नागरिकांची आणि ६७ हजार जनावरांची तहान ७८ टँकरद्वारे भागवली जात आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात ३१ विहिरी आणि २१ कूपनलिका अधिग्रहीत केल्या आहेत.
स्थैर्य, सातारा, दि. २८ : फेब्रुवारी महिन्यापासूनच सातारा जिल्ह्यात कडक उन्हाळा जाणवत असून, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. वाढत्या उष्म्यामुळे नदी, नाले, तलाव, धरणे आणि विहिरींनी तळ गाठला आहे. काही ठिकाणी उन्हाळी पावसाच्या सरी कोसळल्या असल्या तरी, बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्याने पाण्यासाठी गावोगावी नागरिकांची भटकंती सुरूच आहे.
तालुकानिहाय पाणीटंचाईची स्थिती आणि टँकरची संख्या:
-
माण तालुका (सर्वाधिक फटका): तालुक्यातील ४४ गावे आणि १६० वाड्या-वस्त्यांमधील ६०,१८१ नागरिक आणि ४७,८०७ जनावरांना सर्वाधिक ३८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
-
कोरेगाव तालुका: १८ गावांमधील २३,६३६ नागरिक आणि १२,६७० जनावरांसाठी १३ टँकर सुरू आहेत.
-
खटाव तालुका: २० गावे आणि ८ वाड्यांमधील २२,६९७ नागरिक व २,६६९ जनावरांसाठी ११ टँकर धावत आहेत.
-
पाटण तालुका: ८ वाड्यांमधील २,३८९ नागरिक व १,४८० जनावरांना ८ टँकरने पाणी दिले जात आहे.
-
वाई तालुका: ५ गावे व ७ वाड्यांमधील ४,७८६ नागरिक व २,६२९ जनावरांसाठी ६ टँकर सुरू आहेत.
-
खंडाळा व महाबळेश्वर: खंडाळ्यातील गोळेगाव (५०६ नागरिक) आणि महाबळेश्वरमधील भीमनगर (१५३ नागरिक) येथे प्रत्येकी १ टँकर सुरू आहे.
प्रशासनाच्या उपाययोजना:
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकर भरण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात ठिकठिकाणी जलस्रोत अधिग्रहीत केले आहेत. यामध्ये एकूण ३१ विहिरी आणि २१ कूपनलिकांचा समावेश आहे. (तालुकानिहाय अधिग्रहीत विहिरी: माण ११, वाई ३, खटाव ४, कराड ३, फलटण २, कोरेगाव ४, महाबळेश्वर १, जावली ३).
