पंढरपूर (महाराष्ट्र) ते घुमान (पंजाब) पर्यंत २१ दिवसांची सायकल वारी


दैनिक स्थैर्य । दि. २६ जुलै २०२२ । फलटण । भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करणारे तसेच भागवत धर्माची पताका अटकेपार फडकविणारे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जयंती निमित्त शुक्रवार दि. ४ नोव्हेंबर २०२२ ते संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा दरम्यान गुरुवार दि . २४ नोव्हेंबर २०२२ पर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) अशी भागवत धर्माची पताका फडकावित तसेच भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी २१ दिवसांची सायकल वारी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे व संत नामदेव समाजोन्नती परिषदेचे सचिव डॉ. अजय फुटाणे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ, संत नामदेव समाजोन्नती परिषद व श्री संत नामदेव समाज युवक संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संत नामदेव महाराजांचे वंशज ह भ प ज्ञानेश्वर महाराज नामदास, केशव महाराज नामदास, कृष्णदास महाराज नामदास, मुकुंद महाराज नामदास व माधव महाराज नामदास यांच्या आशीर्वादाने या सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री क्षेत्र पंढरपूर, फलटण, सासवड, पुणे, आळंदी, देहू , नाशिक, त्र्यंबकेश्वर मार्गे ही सायकल वारी महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब या राज्यातून अमृतसर मार्गे घुमान असा २१०० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. सोबत संत नामदेव महाराज व गुरु गोविंदसिंह यांचा ग्रंथ, पादुका, भागवत धर्माची पताका व पालखी रथ असणार आहे.

या सायकल वारीत १८ ते ३० वयोगटातील स्त्री , पुरुष सायकल स्वारांना सहभागी करुन घेतले जाणार आहे . या सायकलस्वारांचा श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान पर्यंतचा चहा , नाष्टा , जेवण व निवास तसेच सायकलस्वाराची सायकल पंढरपूर पर्यंत गाडीने मोफत आणण्याचा सर्व खर्च संघटने मार्फत केला जाणार आहे. मात्र घुमान ते पंढरपूर पर्यंतचा परतीचा रेल्वेचा प्रवास सायकलस्वाराला स्वतः करावा लागणार आहे.

या सायकल वारीत सहभागी होण्यासाठी सूर्यकांत भिसे (वेळापूर) ९८२२०२३५६४, डॉ. अजय फुटाणे (पुणे) ९४२२३६२५९५, शंकर टेमघरे (पुणे) ७९७२८५३८९५, संजय नेवासकर (पुणे) ९८२२२८१५८८, ॲड. विलास काटे (आळंदी) ९८२२८५४९५५, रोहित यवतकर (पुणे) ९९७०००१०१०, सुनिल गुरव (पंढरपूर) ९७६७२५७३६७, मनोज मांढरे (सासवड) 9422303343, सुभाष भांबुरे (फलटण)९८२२४१४०३०, गणेश जामदार (अकलूज) ९७६७७९९५९५, सिध्देश हिरवे (शिक्रापूर) ८०८७७६२७८२ व अनंत जवंजाळ (वेळापूर) ७४१०११०४०३ यांच्याशी ३० सप्टेंबर २०२२ पुर्वी संपर्क साधून नांव नोंदणी करावी.

नाव नोंदणी करताना ग्रामपंचायत किंवा पोलिस ठाण्याचा वर्तुनुकीचा दाखला, ओळखपत्राची झेरॉक्स, दोन आयडेंटि साईज फोटो, शासकीय किंवा खाजगी रुग्णालयाचे फिटनेस सर्टिफिकेट, कोरोनाचा बुस्टर डोस घेतलेले सर्टिफिकेट आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या सायकल वारीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्री क्षेत्र आळंदी, श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू, श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, श्री संत सोपानदेव महाराज संस्थान श्री क्षेत्र सासवड, श्री संत मुक्ताबाई महाराज संस्थान श्री क्षेत्र कोथळी – मुक्ताईनगर, श्री संत नामदेव महाराज संस्थान श्री क्षेत्र पंढरपूर व श्री संत एकनाथ महाराज संस्थान श्री क्षेत्र पैठण यांचे सहकार्य लाभणार असल्याचे भिसे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!