
अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियावर चॅटिंग करत असल्याच्या रागातून ढवळपाटी (वाखरी) येथे १८ वर्षीय सोमनाथ जाधव याचा लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून. फलटण ग्रामीण पोलिसांनी वेगाने तपास करत तीन आरोपींना ठोकल्या बेड्या.
स्थैर्य, फलटण, दि. 14 एप्रिल : फलटण तालुक्यातील ढवळपाटी (वाखरी) येथे एका अल्पवयीन मुलीसोबत मोबाईलवर सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘चॅटिंग’ करत असल्याच्या रागातून एका १८ वर्षीय तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून व उचलून जमिनीवर आपटून त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत तीन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
या दुर्दैवी घटनेत खून झालेल्या तरुणाचे नाव सोमनाथ संदीप जाधव (वय १८, रा. मियाचीवाडी-दळवडी, ता. फलटण) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार दि. १० एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री १.२० वाजण्याच्या सुमारास ढवळपाटी, वाखरी (ता. फलटण) येथील मियाचीवाडी कमानीजवळ घडला.
याप्रकरणी मयत सोमनाथचे वडील संदीप उमाजी जाधव यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, मयत सोमनाथ जाधव हा एका अल्पवयीन मुलीशी मोबाईल फोनद्वारे सोशल मीडियावरून वारंवार ‘चॅटिंग’ करत होता. याचाच राग मनात धरून आरोपींनी त्याला मध्यरात्री गाठले. त्यानंतर त्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली आणि उचलून जमिनीवर आपटले. यात गंभीर मार लागल्याने सोमनाथचा मृत्यू झाला.
याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०३(१), ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा (गु.र.नं. १९०/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी फरार झाले होते. मात्र, फलटण ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने (DB) गोपनीय माहितीच्या आधारे त्यांचा शोध घेत खालील तीन आरोपींना अटक केली आहे:
- आदित्य विजय शिंदे (वय २३, रा. ढवळ, ता. फलटण): या मुख्य संशयित आरोपीला दि. ११ एप्रिल रोजी अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
- तेजस ऊर्फ चिक्या शिवाजी लोखंडे (वय २४, रा. ढवळ, ता. फलटण)
- प्रद्युम्न ऊर्फ पिंट्या पांडुरंग लोखंडे (वय २२, रा. ढवळ, ता. फलटण)
वरील तेजस आणि प्रद्युम्न या दोघांना दि. १३ एप्रिल रोजी अटक करण्यात आली असून त्यांना आज (१४ एप्रिल) न्यायालयात हजर केले जाणार आहे. या गुन्ह्यातील चौथा संशयित ‘ओम लोखंडे’ याचा शोध पोलीस घेत आहेत.
सदरची धडक कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक दीपक पवार, महिला उपनिरीक्षक ज्योती चव्हाण, पोलीस अंमलदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सूर्यवंशी, तुषार नलवडे, हणमंत दडस आणि शिवराज जाधव यांनी केली आहे.
