फलटण उपजिल्हा रुग्णालयासाठी १० ऑक्सिजन काँन्सट्रेटोर; श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सुचनेवर आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांची कार्यवाही


स्थैर्य, फलटण, दि. ०७: टेमासेक फौंडेशन, सिंगापूर यांनी महाराष्ट्र शासनाला उपलब्ध करुन दिलेल्या ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन्सपैकी १० मशीन्स महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार येथील उप जिल्हा रुग्णालयास उपलब्ध झाली आहेत.

ऑक्सिजन टंचाईच्या कालावधीत सदर मशीन्स उपलब्ध करुन देण्याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनानुसार सिंगापूर येथून सदर मशीन्स उपलब्ध झाली असून फलटण येथे वाढता कोरोना प्रादुर्भाव, ऑक्सिजनचा तुटवडा विचारात घेऊन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाने सदर १० मशीन्स उप जिल्हा रुग्णालय, फलटण साठी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कडे सुपूर्द केली आहेत.

दरम्यान श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नानुसार सोना अलाइज कंपनी, लोणंद या पोलाद उत्पादक कंपनीच्या ऑक्सिजन प्लांट मधून दररोज सुमारे १५०० ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील ऑक्सिजन टंचाई दूर करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

ऑक्सिजन उपलब्ध झाला तरी त्यासाठी आवश्यक रिकामे सिलेंडर उपलब्ध करुन घेण्यासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व प्रशासन यंत्रणा प्रयत्नशील आहे. अत्यंत अडचणीच्या प्रसंगी सिंगापूर येथील ही ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन्स उपयुक्त ठरणार आहेत, या मशीनमुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.


Back to top button
Don`t copy text!