‘सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना पहिला हार मीच घालेन’; साताऱ्यात खा. सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान


साताऱ्यात शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर मोठे विधान केले. तसेच, कायदा व सुव्यवस्था, आणि ऑपरेशन लोटसवरून सरकारवर जोरदार टीका केली.

स्थैर्य, सातारा, दि. ९ : “सुनेत्रा वहिनी जर राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या, तर त्यांना पहिला हार मीच घालेन,” असे रोखठोक आणि मोठे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी साताऱ्यात केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासमवेत सुप्रिया सुळे सध्या सातारा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील, या जय पवार यांच्या विधानावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता, सुप्रिया सुळे यांनी हे विधान केले.

‘ऑपरेशन लोटस’वरून अमित शहांवर निशाणा

सरकारच्या धोरणांवर आणि ऑपरेशन लोटसवर टीका करताना खा. सुळे म्हणाल्या, “निवडून आल्यापासून आमच्या बाबतीतही ‘ऑपरेशन लोटस’चा प्रयत्न झाला. पण आमच्यावर ईडी-बिडी चालत नाही. त्यामुळे आमच्या मागे कोणतीही इडा-पिडा नाही. आम्ही स्वाभिमानी मराठी माणसे आहोत.” या शब्दांत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना थेट फटकारले.

सातारा झेडपीतील राड्यावर संताप

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “निवड प्रक्रियेवेळी मंत्र्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. याची चर्चा थेट संसदेत झाली. बाहेरच्या राज्यातील खासदारांनी ‘तुमच्या महाराष्ट्रात हे काय चालले आहे?’ असे मला विचारले, हे ऐकून मला अतिशय वेदना झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांना मानणाऱ्या पुरोगामी विचारांच्या सातारा जिल्ह्यात अशा घटना घडत असतील तर त्याची बाहेर अत्यंत वाईट चर्चा होते, याचा विचार केला गेला पाहिजे,” अशा शब्दांत त्यांनी राडा करणाऱ्या नेत्यांच्या कानपिचक्या काढल्या.

ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेवर चिंता

राज्यातील आणि विशेषतः पुण्यातील गुन्हेगारीवर बोलताना त्या म्हणाल्या, “गुन्हेगारीत आता पुणे देशात पाचव्या, तर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आले आहे. राजकारणी म्हणून मी हे बोलत नाही, तर त्या ठिकाणची लोकप्रतिनिधी म्हणून या गोष्टीचे दुःख होत असल्याने बोलत आहे. महिला व नागरिकांच्या सुरक्षिततेला सरकारने प्राथमिकता दिली पाहिजे. मला महाराष्ट्र पोलिसांचा सार्थ अभिमान आहे, त्यांच्या वर्दीचा धाक गुन्हेगारांवर बसलाच पाहिजे.”

१५ मे नंतर राज्याचा दौरा करणार

सध्या राज्यातील शेतकरी आणि सामान्य माणूस अडचणीत असल्याचे सांगत खा. सुळे म्हणाल्या:

  • अवकाळी पावसामुळे शेतीचे अपरिमित नुकसान होत आहे, मात्र त्याचे वेळेवर पंचनामे होत नाहीत.

  • राज्यावर दुष्काळाचे मोठे सावट आहे आणि शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही.

  • महागाई आणि बेरोजगारीचे गंभीर प्रश्न जनतेला सतावत आहेत.

  • या पार्श्वभूमीवर सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी पवारसाहेब आणि मी स्वतः १५ मे नंतर राज्याचा दौरा करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत.

‘२०२९ मध्ये कोण कुठे असेल सांगता येत नाही…’

सरकारमधीलच नेते सध्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत आणि एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. त्यामुळे २०२९ च्या निवडणुकीवेळी नेमके कोण कुठे असेल, हे आताच सांगता येत नाही, असे सूचक विधान करून खा. सुप्रिया सुळे यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशी द्या

नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणाचा खटला ‘फास्ट ट्रॅक कोर्टात’ (जलदगती न्यायालयात) चालवून, या भीषण घटनेतील आरोपीला भरचौकात फाशी द्यावी, अशी कठोर मागणीही खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.


Back to top button
Don`t copy text!