लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करणाऱ्या बोरव्हा ग्रामस्थांच्या पा‍ठिशी शासन खंबीरपणे उभे राहील – पालकमंत्री शंभूराज देसाई


स्थैर्य, वाशिम, दि. २९ : बोरव्हा या छोट्याशा गावातील ग्रामस्थांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत राज्यात चमकदार कामगिरी केली. गावकऱ्यांनी श्रमदानातून केलेले काम कौतुकास्पद आहे. गावाचा विकास साधण्यासाठी ग्रामस्थ करीत असलेल्या प्रयत्नांना शासन सर्वोतोपरी सहकार्य मदत करेल, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बोरव्हा (ता. मंगरुळपीर) येथे केले.

पालकमंत्री श्री. देसाई यांनी २८ डिसेंबर रोजी बोरव्हा गावाला भेट देऊन गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामांची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावर, सरपंच गोपाल लुंगे, पानी फाउंडेशनचे सुभाष नानवटे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांनी गावाच्या आदर्श पाणलोट प्रतिकृतीच्या सहाय्याने गावाची भौगोलिक स्थिती, श्रमदानातून झालेली कामे आदी विषयी माहिती दिली. तसेच गावामध्ये मोठ्या शेततळ्याची निर्मिती करणे व अडाण नदीतील पाणी सौरपंपाच्या सहाय्याने शेततळ्यामध्ये टाकून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये विद्युत पंपाशिवाय पाणी पोहोचविण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, बोरव्हा येथील ग्रामस्थांनी आपल्या गावाच्या विकासाचे स्वप्न पाहिले असून त्यासाठी एकत्र येऊन लोकसहभागातून फार मोठे काम केले आहे. तसेच आणखी काही कामांचे नियोजन करून ती पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचे हे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे. लोकसहभागातून गावाचा पाण्याचा, सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या गावकऱ्यांना शासन सर्वोतोपरी मदत करेल. तसेच गावाने नियोजन केलेला सौरपंपाच्या सहाय्याने पाणी उपसा करण्याचा प्रकल्प पूर्ण करून बोरव्हा गावाला ‘मॉडेल व्हिलेज’ बनविण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले जातील. तसेच गावाच्या रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे पालकमंत्री म्हणाले. बोरव्हा येथे लोकसहभागातून होत असलेल्या ‘रुफ वॉटर हार्वेस्टिंग’च्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.

पारवा येथे होणार लोकसहभागातून शेततळे ; पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

मंगरुळपीर तालुक्यातील पारवा गावांमध्ये लोकसहभागातून शेततळ्याची निर्मिती करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावर, सरपंच गोपाल लुंगे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!