
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त फलटण येथील पालखीतळावर वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी विशेष दक्षता घेतली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १६ जुलै : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी फलटण नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले आहे. मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी थेट पालखीतळावर तळ ठोकून आवश्यक त्या उपाययोजनांना गती दिली आहे.
पावसाच्या शक्यतेने विशेष दक्षता
फलटण विमानतळ परिसरातील पालखीतळ सुसज्ज असून तेथे पाण्याचा निचरा होण्याची चांगली व्यवस्था आहे. मात्र, अचानक पाऊस आल्यास वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी संपूर्ण मैदानावर बारीक वाळू (ग्रीड) टाकण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. नुकत्याच लोणंद येथील पालखीतळावर पावसामुळे झालेल्या गैरसोयीची पुनरावृत्ती फलटणमध्ये होऊ नये, यासाठी ही विशेष दक्षता घेतली जात आहे.
अधिकाऱ्यांचा संयुक्त पाहणी दौरा
या कामांच्या नियोजनासाठी मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्यासह बांधकाम अभियंता आर. डी. गायकवाड, पाणीपुरवठा विभाग प्रमुख विनोद जाधव आणि नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित आहेत. याशिवाय वारकऱ्यांना भुरट्या चोऱ्यांपासून वाचवण्यासाठी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ आणि पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्यासोबत संयुक्त पाहणी करण्यात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना या पाहणीत देण्यात आल्या आहेत.
