के.बी. बायो ऑरगॅनिकचे पीकसंरक्षण तंत्रज्ञान जागतिक बाजारपेठेत झळकणार

भारताच्या सेंद्रिय व शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या के.बी. बायो ऑरगॅनिक कंपनीच्या पीकसंरक्षण तंत्रज्ञानाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १५ जुलै : भारतीय शेती क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली असून, के.बी. बायो ऑरगॅनिक कंपनीच्या वनस्पतीजन्य (Botanical) पीकसंरक्षण तंत्रज्ञानाला भारत सरकारच्या केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीकडून (CIB & RC) अधिकृत मान्यता मिळाली आहे. या मान्यतेमुळे जागतिक बाजारपेठेत भारतीय सेंद्रिय कृषी उत्पादनांना मोठी मागणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

संशोधनातून साकारले पीकसंरक्षण तंत्रज्ञान

के.बी. बायो ऑरगॅनिकचे व्यवस्थापकीय संचालक सचिन यादव यांच्या नेतृत्वाखाली २०१८ पासून या वनस्पतीजन्य तंत्रज्ञानाच्या विकासाचा प्रवास सुरू झाला. कंपनीच्या संशोधन व विकास (R&D) विभागाने दीर्घकाळ कठोर परिश्रम घेत हे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान विकसित केले आहे. यासाठी ७५ हून अधिक संशोधकांनी तीन वर्षे सातत्याने काम केले असून, देशातील विविध कृषी विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या हवामानात याच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

जागतिक बाजारात भारताची नवी ओळख

या नोंदणीअंतर्गत ‘फंगो रेझ’ (वनस्पतीजन्य बुरशीनाशक) आणि ‘थ्रिप्स रेझ’ (वनस्पतीजन्य कीटकनाशक) या दोन फॉर्म्युलेशन्सना पेटंट आणि अधिकृत मान्यता मिळाली आहे. ही उत्पादने फवारणीनंतर केवळ ४८ तासांत आपला प्रभाव दाखवतात आणि त्यांचा पीक काढणी कालावधी (PHI) शून्य आहे. सध्या ही उत्पादने भारतातील ११ राज्यांमध्ये कार्यरत असून, केनिया आणि दक्षिण अमेरिकेसह तब्बल ३२ देशांमध्ये त्यांची निर्यात केली जात आहे. युरोपीय, अमेरिकन आणि आफ्रिकन देशांमध्ये या तंत्रज्ञानाला मोठी मागणी असून, यामुळे भविष्यात रासायनिक अवशेषांमुळे होणारे भारताचे मोठे आर्थिक नुकसान टाळता येणार आहे.

Back to top button
Don`t copy text!