भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी आमदार डॉ. अतुल सुरेश भोसले यांची निवड


दैनिक स्थैर्य । 15 मे 2025। सातारा । गेल्या काही दिवसापासून प्रतिक्षा असलेल्या सातारा जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉ. अतुल सुरेश भोसले यांची मंगळवारी निवड जाहीर करण्यात आली. प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी ही निवड जाहीर केली. त्यांच्या या निवडीने भाजपला तरुण जिल्हाध्यक्ष लाभला आहे.

भाजपच्या वतीने गत काही महिन्यांपासून संघटन पर्व 2 राबवण्यात येत आहे. त्यामध्ये बूथ अध्यक्ष, तालुकाध्यक्ष निवडण्यात आले होते. मंगळवारी सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. अतुल भोसले यांची निवड करण्यात आली आहे. अतुल भोसले यांच्या निवडीमुळे जिल्ह्याला एक तरुण जिल्हाध्यक्ष मिळाल्याच्या भावना कार्यकर्त्यांच्यात आहेत.

आमदार डॉ. अतुल भोसले यांनी यापूर्वी भाजप प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून काम पाहिले आहे. गत लोकसभा निवडणुकीच्या वेळी लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख म्हणून त्यांनी चांगले काम करून दाखवले होते. त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माई मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्षपदाची धुराही यशस्वीपणे सांभाळली होती. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी मोठ्या मताधिक्याने कराड दक्षिण मधून विजय संपादन केला आहे. या सर्व बाबींचा सकारात्मक विचार करूनच त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे मानले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्त्वाची मानली जाते.

खरंतर जिल्हाध्यक्ष पदाच्या स्पर्धेमध्ये मी कोठेही नव्हतो. मात्र पक्षाने माझ्यावर ही जबाबदारी दिली आहे. पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी पार पाडणे माझे कर्तव्य आहे.
– आमदार डॉ. अतुल सुरेश भोसले


Back to top button
Don`t copy text!