तरुणांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून रोजगार मिळवावा – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २२ मे २०२३ । जालना । राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक तालुक्यात पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या मेळाव्यात ग्रामीण भागातील मुलांना नोकरीची संधी उपलब्ध होत आहे. आपल्या देशात मनुष्यबळाची कमतरता नसून कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस औद्योगिक क्षेत्राला उणीव भासत आहे. त्यामुळे तरुणांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून रोजगार कसा मिळविता येईल यावर लक्ष केंद्रीत करावे. तसेच एखाद्या औद्योगिक कंपनीत कुठल्याही पदावर काम करत असताना त्या कंपनीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचे ज्ञान आत्मसात करुन भविष्यात मोठा उद्योगपती होण्याच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

जालना येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या व भोकरदन येथील मोरेश्वर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भोकरदन यांच्या संयुक्त विद्यमाने भोकरदन येथे आज पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार संतोष दानवे, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जालना येथील कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे, मोरेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य भगवान डोंगरे, तुकाराम जाधव, संतोष जगताप, कौशल्य विकास अधिकारी सुरेश बहुरे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

या मेळाव्यात ९१३ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी ५२४ उमेदवारांची निवड झाली. त्यापैकी ४६ उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्रे देण्यात आली.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे म्हणाले की, उमेदवारांनी सर्व परिस्थितीचा प्रथम अभ्यास करुन रोजगार मेळाव्यातून नोकरी निवडावी. उमेदवाराच्या कौशल्यावर या मेळाव्यातून नोकरी मिळणार असल्याने आपली निवड न झाल्यास खचून न जाता नव्याने पुन्हा तयारीला लागून पुढील रोजगार मेळाव्यात नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावा. आपल्या शहर परिसरातील उद्योग व्यवसायाचा अभ्यास करुन त्या-त्या क्षेत्रातील योग्यतेची पात्रता संपादन करावी. जेणेकरुन आपल्या आवडत्या क्षेत्रात आपल्याला नोकरीची संधी प्राप्त होवू शकेल, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. ज्या उमेदवारांना नोकरीची संधी प्राप्त नाही अशा उमेदवारांनी येथे भरविण्यात आलेल्या विविध महामंडळाकडून व्यवसायासाठी मिळणारे कर्ज घेऊन आपला स्वत: व्यवसाय उभारावा असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.

आमदार संतोष दानवे, वसंत जगताप यांची समयोचित भाषणे झाली. संपत चाटे यांनी प्रास्ताविक केले. कौशल्य विकास अधिकारी सुरेश बहुरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास पदाधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, सुशिक्षीत बेरोजगार उमेदवार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीसाठी अमोल बोरकर, आत्माराम दळवी, कैलास काळे, प्रदीप डोळे, उमेश कोल्हे, सोमेश्वर शिंदे, दिनेश उढाण, रामदास फुले यांनी परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!