
स्थैर्य, फलटण, दि. २०: स्व. राजीव गांधी यांनी देशाला एकविसाव्या शतकात नेण्याचे स्वप्न पाहून आधुनिक तंत्रज्ञान आणले. त्यावेळी हेच भाजपावाले त्याला तीव्र विरोध करत होते, मात्र त्याच तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून भाजपा आज समाजात खोटी माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करत आहे परंतु त्यांना आता काँग्रेसकडूनही चोख उत्तर मिळेल. भाजपाकडून केला जात असलेला अपप्रचार काँग्रेस सकारात्मकतेने खोडून काढेल व सत्य माहिती जनेतसमोर आणेल. भाजपाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने अपप्रचार केला जातो. भाजपा ही खोटी माहिती पसरवणारी मोठी फॅक्टरी आहे. पण आता याच माध्यमातून भाजपाला काँग्रेसकडून उत्तर मिळेल. फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील राष्ट्रोय काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आगामी काळामध्ये सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष व विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया सेलचे राज्याचे सचिव महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची नुकतीच भेट घेतली. त्या भेटी दरम्यान सातारा जिल्ह्याच्या विकासाबाबत व सातारा जिल्ह्यामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध विषयांवर चर्चा झाली.
भारतीय जनता पक्ष हा सोशल मीडियाच्या माध्यमातून विखारी प्रचार करत असून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. परंतु भाजपाच्या या विखारी प्रचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काँग्रेसचा सोशल मीडियाही सक्रीय झाला आहे. सोशल मीडियाच्या या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काँग्रेसचे दोन लाख गांधीदूत भाजपाच्या विखारी प्रचाराला चोख उत्तर देतीलं असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.