स्थैर्य, मुंबई, दि.१: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी मुंबई दौऱ्यावर असून यावेळी ते बॉलिवूड सेलिब्रेटींसह निर्माता आणि दिग्दर्शकांची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशात उभारण्यात येणाऱ्या फिल्मसिटीसंबंधी योगी आदित्यनाथ यावेळी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. मुंबईमधील चित्रपट उद्योगाला आकर्षित करण्याचा योगी आदित्यनाथ यांचा विचार असून महाराष्ट्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी हा डाव असल्याचे काही राजकीय जाणकारांचे मत आहे.
सप्टेंबर महिन्यात योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या फिल्म सिटीची घोषणा केली होती. देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज असून आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एका भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार असल्याचे ते म्हणाले होते. योगी आदित्यनाथ यांनी फिल्मसिटी उभारण्यासाठी नोएडा जवळील यमुना एक्स्प्रेसवेवर असणारी एक हजार एकर जागाही राखून ठेवली आहे. ही फिल्मसिटी बॉलिवूडपेक्षाही मोठी असेल असे योगी आदित्यनाथ यांचे म्हणणे आहे. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली होती. “बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता.
या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांची आजची भेट महत्त्वाची ठरणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या बैठकीत बॉलिवूडमधून कोणकोण उपस्थित राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.