फलटण तालुक्यातून लंपिला हद्दपार करण्यासाठी कार्यरत रहा : श्रीमंत रामराजे


दैनिक स्थैर्य | २७ सप्टेंबर २०२२ | फलटण | सध्या सातारा जिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यात लंपी हा पशुधनातील आजार मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. आगामी काही दिवसांमध्ये लंपिचा प्रादुर्भाव फलटण तालुक्यामध्ये वाढू न देण्यासाठी फलटण तालुका प्रसाशनाने सदैव कार्यरत राहावे. पशुधनामध्ये असलेल्या लंपि या आजाराला फलटण तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी कार्यरत राहा, असे आवाहन विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे.

फलटण पंचायत समितीच्या सभागृहात लंपि आजाराबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माणिकराव सोनवलकर, पशुसंवर्धन विभागाचे सातारा उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी सौ. अमिता गावडे, पंचायत समितीचे माजी सभापती शंकर माडकर, सौ. प्रतिभा धुमाळ, माजी उपसभापती सौ. रेखा खरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार श्रीमंत रामराजे म्हणाले कि, फलटण तालुक्यामध्ये पशुधनातील लंपी या आजाराची सुरवात झाल्यापासून आज अखेर मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आलेले आहे. आगामी काही आठवड्यात फलटण तालुक्यात १०० % लसीकरण पूर्ण होईल. त्यानंतर लंपी बाधित पशुधन संख्या कमी होईल. सद्य परिस्थितीमध्ये फलटण तालुक्यात असलेल्या लंपी या आजाराला रोखण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने कार्यरत राहून शेतकऱ्यांना पूर्णतः मदत करावी.

फलटण तालुक्यात लंपी या पशुधनामधील आजाराचे मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेला आहे. फलटण तालुक्यात लंपी पासून बचाव करण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी सर्वतोपरी सहकार्य करणे गरजेचे आहे. सातारा जिल्ह्यामध्ये लंपीचे सर्वाधिक रुग्ण हे फलटण तालुक्यात आहेत. लंपी हा म्हशींमध्ये उद्भवत नाही. लंपी हा फक्त गोवंशीय प्राण्यातच आढळून येत आहे. त्यामुळे आगामी काळात लंपी बाबत दक्ष राहूनच अधिकाऱ्यांनी कामकाज करावे, असे मत आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.

फलटण तालुक्यामधील जनावरांचे लंपीचे लसीकरण जवळपास ८० % झालेले आहे. आगामी काही दिवसामध्ये फलटण तालुक्यातील १०० % जनावरांचे लसीकरण पूर्ण होईल. फलटण तालुक्यात लंपीचा उपचार करण्यासाठी ज्या ठिकाणी वाहनांची व मनुष्यबळ कमतरता असेल त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात तातडीने यंत्रणा उभी करू. पशुसंवर्धन विभागातील जी पदे फलटण तालुक्यातील रिक्त आहेत. त्या ठिकाणी कंत्राटी पद्धीतीने पदे भरलेली आहेत. आगामी काळामध्ये फलटण तालुक्यात सुमारे २५ पशुवैद्यकीय दवाखाने सुरु होण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आपण शासन दरबारी प्रयत्न करणार आहोत, असे मत यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सातारा उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी फलटण तालुक्यातील लंपीबाबत सविस्तर माहिती दिली. आभार गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!