
आज दिनांक 8 मार्च 2025, म्हणजेच जागतिक महिला दिन. या दिवशी महिलांच्या यशाबद्दल आणि त्यांच्या जीवनातील योगदानाबद्दल मनापासून आभार मानण्याचा दिवस आहे. परंतु, आजच्या विषयाचा वेध घेण्याची वेळ आली आहे, तो म्हणजे महिलांचे आरोग्य. स्त्री ही घराची होम मिनिस्टर असते, ती माता, सासू, पत्नी, मुलगी, सून, बहीण, वहिनी अशी अनेक भूमिका सांभाळते. आज महिला चूल आणि मूल या पलीकडे गेल्या आहेत, घराबाहेर पडून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करत आहेत. परंतु, या सर्व व्यस्ततेत तिला तिच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही.
महिलांमध्ये अनेक आरोग्य समस्या आढळतात, ज्या त्यांच्या दैनंदिन जीवनातील निर्णयांवर आणि जीवनशैलीवर अवलंबून असतात. यात स्थूलपणा (Obesity), हाडे ठिसूळ पणा (Osteoporosis), कर्करोग (Cancer), मानसिक आजार (नैराश्य, चिडचिडेपणा, न्यूनगंडपणा, एकटेपणा), आणि हॉर्मोनल इंबालन्स यासारख्या आजारांचा समावेश होतो.
1. स्थूलपणा (Obesity) : स्थूलपणा ही एक मोठी समस्या आहे जी गर्भावस्थेत वाढलेल्या वजनामुळे आणि नंतर ते कमी न होण्यामुळे वाढते. अनावश्यक आहार, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे वजन वाढते आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल वाढीस लागतो. स्थूलपणामुळे शरीराचा अतिरिक्त भार दोन्ही गुढग्यांवर पडून ते लवकर झिजतात.
2. हाडे ठिसूळ पणा (Osteoporosis) : चाळिशी नंतर पाळी irregular होते आणि मग साधारण ४५ वयानंतर ती बंद होते. पाळी बंद झाल्यानंतर oestrogen नावाचा hormone चा स्त्राव बंद होतो आणि हाडातील कॅल्शियम निघून जातो. हाडे ठिसूळ झाल्यामुळे ती मोडण्याची शक्यता वाढते आणि पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हाडे मोडण्याचे प्रमाण ७० टक्क्याहून जास्त आहे.
3. कर्करोग (Cancer) : महिलांमध्ये स्तन कर्करोग, अंडाशयाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि मल्टिपल मायलोमा यासारखे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. केमिकल युक्त अन्न, दूषित पाणी, दूषित हवा, मानसिक ताण आणि आनुवंशिकता या कारणांमुळे कर्करोगाचा धोका वाढतो.
4. मानसिक आजार : नवरा कामात व्यस्त असतो, मुले मोठी झालेली असतात, घरातील स्त्री एकटीच असते. तिला दुय्यम दर्जा दिला जातो आणि मग एकटेपणा जाणवायला लागतो. नैराश्य, चिडचिडेपणा, न्यूनगंडपणा या समस्या वाढतात.
5. हॉर्मोनल इंबालन्स : पाळी बंद झाल्यानंतर oestrogen आणि progesterone हॉर्मोन्स पूर्णपणे शरीरातून निघून जातात. त्याचा परिणाम थायरॉईड, स्वादुपिंड, मूत्रपिंड आणि अड्रेनल ग्रंथींवर होऊन त्याचा असंतुलन होतो. त्यामुळे थायरॉईड ग्रंथीचे आजार, मधुमेह, स्थूलपणा वाढीस लागते.
महिलांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्यात :
1. वेळेचे नियोजन : घरातील सर्वांची काळजी घेऊन स्वतःची काळजी पण घ्यायला शिका. घरातील लोकांना कामामध्ये सहभागी करून घ्या.
2. नियमित व्यायाम : रोज सकाळी किंवा संध्याकाळी १/२ ते १ तास घाम येईल इतका व्यायाम करा. योगासने, सूर्यनमस्कार, पायी चालणे, पोहणे, जिमिंग यापैकी काही करावे.
3. सकस आणि सात्विक आहार : घरी शिजवलेले आणि ताजे अन्न खावे. तीन वेळा खावे; सकाळचा नाश्ता भरपेट, दुपारचे जेवण दोन घास कमी आणि रात्री मित आहार.
4. पाणी प्यावे : दिवसातून साधारण ३ लिटर पाणी प्यावे.
5. शांत झोप : रात्री ७ ते ८ तास शांत झोप घ्यावी.
6. स्वतःच्या शरीराचे परीक्षण : रोज स्वतःच्या शरीराचे ५ ते १० मिनिटे परीक्षण करावे.
7. छंद जोपासा : आपल्यामधील प्रतिभेला ओळखा आणि ती जोपासून वाढवा.
महिलांच्या आरोग्याकडे लक्ष दिल्याने त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य आणि समाजाचे सामान्य आरोग्य सुधारते. आरोग्य उत्तम राहिल्याने महिला अधिक सक्षम बनतात आणि त्यांचे योगदान समाजात वाढते. मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा संतुलन राखल्याने त्यांच्या जीवनाची गुणवत्ता वाढते.
डॉ. प्रसाद जोशी यांच्या मते, “महिलांनी स्वतःकडे लक्ष द्यायला हवे. स्वतःसाठी वेळ काढणे आणि नियमित व्यायाम करणे हे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांचे आरोग्य उत्तम राहिल्याने केवळ त्यांचाच नाही तर संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा फायदा होतो.”
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या आरोग्याकडे लक्ष वेधणे ही एक महत्त्वाची बाब आहे. महिलांनी स्वतःकडे लक्ष द्यायला हवे, स्वतःसाठी वेळ काढायला हवा आणि नियमित व्यायाम करायला हवा. यामुळे त्यांचे आरोग्य उत्तम राहते आणि त्या अधिक सक्षम बनतात. सर्व महिलांना वंदन करून जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!