दैनिक स्थैर्य । दि.१० फेब्रुवारी २०२१ । खटाव । उंबर्डे (ता.खटाव) गावाजवळ दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. रेश्मा जावेद मुल्ला (वय ५०, रा. वडूज, ता. खटाव ) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वडूज येथील मुल्ला दांपत्य आज कराडहून वडूजकडे येत होते. दुपारी एक वाजण्याच्या
सुमारास उंबर्डे फाट्यानजिक आल्यानंतर पाठीमागे बसलेल्या रेश्मा यांचा अचानक तोल जावून त्या दुचाकीवरून खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. घटनेची माहिती शहरात समजताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. उपचारार्थ त्यांना दवाखान्यात आणण्यात आले मात्र तो पर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली.
जुन्या पिढीतील प्रसिध्द सुलतान लालखान कापड दुकानाचे मालक व मुल्ला मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष जावेद मुल्ला यांच्या त्या पत्नी तर युवा कार्यकर्ते फजल मुल्ला यांच्या त्या आई होत. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सून, तीन मुली असा परिवार आहे.