
निरा खोऱ्यात जोरदार पावसामुळे भाटघर, निरा देवघर, वीर आणि गुंजवणी धरणांचा एकूण पाणीसाठा ५० टक्क्यांवर पोहोचला असून, २४ तासांत ६ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ८ जुलै : निरा खोऱ्यात गेल्या २४ तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे चार प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. भाटघर, निरा देवघर, वीर आणि गुंजवणी या चार धरणांमध्ये एकूण ६.२१८ टीएमसी पाण्याची आवक झाली असून, धरणांमधील एकूण पाणीसाठा २४.४०२ टीएमसी म्हणजेच ५०.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
गुंजवणीत सर्वाधिक पावसाची नोंद
गेल्या २४ तासांत गुंजवणी धरण क्षेत्रात सर्वाधिक १६२ मिलिमीटर पाऊस पडला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा १.६९६ टीएमसी (४५.९५ टक्के) झाला असून ३६६ क्यूसेक पाण्याची आवक सुरू आहे. निरा देवघर धरण परिसरात ९० मिलिमीटर पाऊस झाला असून येथील पाणीसाठा ५.९२३ टीएमसी (५०.४९ टक्के) इतका झाला आहे. या धरणात ९१८ क्यूसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे.
भाटघर आणि वीर धरणाची स्थिती
भाटघर धरण क्षेत्रात ६३ मिलिमीटर पाऊस झाला असून धरणातील पाणीसाठा ९.५०४ टीएमसीवर (४०.४४ टक्के) पोहोचला आहे. येथे २,५५२ क्यूसेक पाण्याची आवक सुरू आहे. तसेच वीर धरण परिसरात ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून पाणीसाठा ७.२७९ टीएमसी (७७.३७ टक्के) आहे. सध्या निरा डाव्या कालव्यातून ३०० क्यूसेक आणि उजव्या कालव्यातून ८०२ क्यूसेक पाण्याचा प्रवाह सुरू आहे. सध्या कोणत्याही धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रात विसर्ग करण्यात आलेला नाही.
गतवर्षाच्या तुलनेत पाणीसाठा
मागील वर्षी याच दिवशी निरा खोऱ्यातील चारही धरणांमध्ये ३४.०८७ टीएमसी (७०.५३ टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा हा साठा २४.४०२ टीएमसी (५०.४९ टक्के) असल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा काहीसा कमी आहे. मात्र, सध्या सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे आगामी काळात धरणसाठ्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
