दैनिक स्थैर्य | दि. २१ मे २०२३ | फलटण |
वाखरी (ता. फलटण) गावच्या हद्दीत असलेल्या पिंपळेचा मळा येथे दोघाजणांनी दाम्पत्याला मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच महिलेचा विनयभंग केल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. केतन दत्तात्रय ढेकळे व मेघनाथ भैरवनाथ ढेकळे (दोघेही रा. वाखरी, ता. फलटण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २० मे रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास वाखरी (ता. फलटण) गावच्या हद्दीत असलेल्या पिंपळेचा मळा येथे फिर्यादी महिलेच्या शेतात वरील आरोपींनी फिर्यादीच्या सामायिक विद्युत मोटारीचा फ्यूज काढला होता. तो फ्यूज फिर्यादी व फिर्यादीचे पती मागण्यास गेल्यानंतर केतन ढेकळे व मेघनाथ ढेकळे यांनी फिर्यादीच्या पतीला व फिर्यादीला हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली व केतन ढेकळे याने फिर्यादीचा उजवा हात धरून त्याच्या जवळ ओढले व फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, अशी तक्रार पोलिसात दाखल झाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी वरील दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो.हवा. कदम करत आहेत.