
स्थैर्य, विसापूर, दि.२५: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ महिने राज्यातील बंद असलेली मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, मंदिरे उघडण्यासोबतच राज्य सरकार ग्रामीण भागातील यात्रांना परवानगी देणार का? अशी नागरिकांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील म्हसवड, पुसेगाव, औंध, पाली या यात्रा महिन्याच्या अंतराने भरतात. म्हसवडच्या यात्रेस फक्त काही दिवसांचाच कालावधी राहिला आहे. या यात्रांमध्ये तात्पुरता व्यवसाय करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असलेल्या व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. आकाशी पाळणे, खेळण्याची दुकाने, प्रसादाची दुकाने, मिठाई, जिलेबी-फरसाण, संसारोपयोगी वस्तू, सौंदर्य प्रसाधने, मनोरंजनाची साधने आदी विक्री करणारे व्यावसायिक यात्रेसाठी येतात. यात्रेतील या हंगामी व्यवसायावर हजारो कुटुंबे अवलंबून असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून चालू वर्षीच्या यात्रा रद्द झाल्याने या व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी, मंदिरे दर्शनासाठी खुली झाली असली, तरी आगामी यात्रा भरविण्यास राज्य सरकार परवानगी देणार का? या चिंतेत हंगामी व्यावसायिक सापडले आहेत.
महामार्गालगतच्या बॅटरी दुकानांत चोरट्यांचा धूडगूस; तब्बल 28 बॅटरी पळवल्या
दरम्यान, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशासह भारतातील विविध राज्यातील लाखो भाविकही या यात्रा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित असतात. ग्रामीण भागातील या यात्रांमध्ये कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. मात्र, या यात्रा भरविण्यास परवानगी न मिळाल्यास हंगामी व्यावसायिकांसोबतच स्थानिक व्यापाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. लॉकडाउनमुळे डबघाईला आलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मकता दाखवून या यात्रांना परवानगी देण्याची मागणी भाविक, व्यावसायिक व नागरिक करत आहेत.
मागील 15 वर्षांपासून यात्रांमध्ये मिठाईच्या दुकानाचा व्यवसाय करतो. माझ्यासाठी हा हंगामी व्यवसाय उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मात्र, यात्रा बंद असल्याने नुकसान भरून काढणे कठीण झाले आहे.