कोळकी नगरपंचायत होणार का ?ग्रामपंचायत निवडणुकीत गाजणार मुद्दा 


 

स्थैर्य, फलटण दि.१२ : लोकसंख्येच्यादृष्टीने फलटण तालुक्यातील मोठ्या व शहराच्या शेजारी असलेल्या कोळकी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये होणार की फलटण नगरपालिकेच्या हद्दवाढीत कोळकीचा सहभाग फलटण शहरात केला जाणार याकडे गेली बरेच वर्षं कोळकी ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिलेले आहे. कोळकी परिसराचा विकास होण्यासाठी कोळकीची स्वतंत्र नगरपंचायत व्हावी, अशी अपेक्षा स्थानिकांची आहे. मात्र केवळ राजकीय अडचणींमुळे कोळकी नगरपंचायत होत नसल्याची चर्चा दबक्या आवाजात कोळकीमध्ये सतत सुरु असते. या पार्श्‍वभूमीवर ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा बनलेला ‘कोळकी नगरपंचायत होणार का’? हा मुद्दा आगामी कोळकी ग्रामपंचयतीच्या निवडणुकीत चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.

फलटण शहराच्या सिमेला लागून असलेल्या कोळकी ग्रामपंचायतीची कागदोपत्री सुमारे आठ हजार लोकसंख्या असून जवळपास तीन हजार सहाशे मिळकत धारक आहेत. वास्तविक पाहता कोळकी ग्रामपंचायत क्षेत्रात सुमारे पंचवीस हजाराहून अधिक लोकसंख्या असल्याचे, जाणकारांचे मत आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होण्यासाठी जो कोणता पक्ष ठाम भूमिका घेवून काम करेल त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ग्रामस्थ उभे राहतील, अशी दबक्या आवाजात चर्चा कोळकीमध्ये सध्या सुरु आहे.

वास्तविक पाहता कोळकीच्या विकासाला चालना देण्यासाठी कोळकी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये होणे गरजेचे आहे. नगरपंचायत झाल्यानंतर परिसराचा झपाट्याने विकास होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण सातारा जिल्ह्यातील कराड शेजारील मलकापूरमध्ये दिसून येते. मलकापूर ग्रामपंचायतीचे रुपांतर मलकापूर नगरपंचायतमध्ये झाले व त्यानंतर काही दिवसातच नगरपंचायतीचे रूपांतर हे नगर परिषदेमध्ये झाले. नगर पंचायत झाल्यानंतर मलकापूरचा विकास अत्यंत झपाट्याने झाला. याचपद्धतीने कोळकी ग्रामपंचायतीचे रूपांतर कोळकी नगरपंचायतीमध्ये करुन गावाचा विकास नेतेमंडळींनी साधावा, अशी माफक अपेक्षा कोळकीतील युवक व्यक्त करीत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!