कोळकी नगरपंचायतीसाठी भाजपा आग्रही राहणार : जयकुमार शिंदे


 

स्थैर्य, कोळकी दि.१२: कोळकी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये वास्तविक पाहता यापूर्वीच होणे गरजेचे होते. कोळकी गावाचा विकास करण्यासाठी कोळकी नगरपंचायत अत्यंत महत्त्वाची असून भारतीय जनता पार्टीची कोळकी ग्रामपंचायतीवर सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पार्टी मार्फत नक्कीच नगरपंचायतीसाठी आग्रहाने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिली.

कोळकी ग्रामपंचयतीच्या हद्दीमध्ये सुमारे तीन हजार सहाशे मिळकत धारक असून वास्तविक कोळकीची लोकसंख्या 25 हजारांच्या पुढे आहे. 2011 च्या जनगणनेनुसार कोळकी गावांमध्ये लोकसंख्या फक्त 8054 दाखवण्यात आलेली आहे. यापूर्वीही कोळकी ग्रामपंचायतीवरील सत्ताधार्‍यांना वारंवार आम्ही कोळकी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये होणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. यासाठी कोळकी गावांमध्ये बर्‍याच वर्षांपासून जी बाहेरगावची माणसे राहतात त्यांची कोळकी गावच्या मतदार यादीत मतदार म्हणून नोंद करुन घेण्याची मागणीही आम्ही यापूर्वी अनेकदा केली होती. परंतु सत्ताधार्‍यांनी त्यास केराची टोपली दाखवल्याने गावाची नगरपंचायत होऊ शकली नाही. तरी आगामी ग्रामपंचायत निवडणूकीत ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीला सत्ता दिल्यास ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत मध्ये करण्यासाठी आम्ही नक्कीच यशस्वी प्रयत्न करु, असा विश्‍वासही यावेळी जयकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!