सह्याद्री कदम शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश करणार?; चर्चांना उधाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 08 जुलै 2024 | फलटण | फलटणचे माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांचे सुपुत्र सह्याद्री चिमणराव कदम हे आगामी काळामध्ये ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या फलटण तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की; लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे रिंगणामध्ये होते. त्यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार हे फलटण येथे आले होते. प्रचार सभेच्या आधी शरद पवार यांनी पूर्वीचे सर्व वैरावर पडदा टाकण्यासाठी माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांचे सुपुत्र सह्याद्री चिमणराव कदम यांच्या निवासस्थानी जाऊन एक वेगळा संदेश दिला होता.

त्यानंतर काही दिवसांनी बारामती तालुक्यातील निंबुत येथे काकडे कुटुंबीयांच्या घरी माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार आले होते. त्यावेळी सुद्धा शरद पवार यांच्या समवेत सह्याद्री चिमणराव कदम हे सावली सारखे दिसत होते.

यासोबतच काल सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वडजल येथे झालेल्या कार्यक्रमाच्या पूर्वी शरद पवार हे कार्यक्रम स्थळी दाखल होताना शरद पवार यांच्या गाडीमध्ये सह्याद्री कदम सुद्धा होते.

या सर्व घडामोडींचा अंदाज घेता फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुढील वाटचाली मध्ये युवा नेतृत्व म्हणून सह्याद्री चिमणराव कदम यांना पक्षामध्ये घेण्याची खेळी शरद पवार खेळू शकतात; अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागल्या आहेत.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच आमची वाटचाल सुरू आहे. शरदचंद्र पवार यांनी जो विश्वास टाकला आहे; त्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही. माजी आमदार स्वर्गीय चिमणराव कदम यांच्या विचारांचे जे कार्यकर्ते आहेत; त्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन व त्यांच्या मतानुसारच आगामी काळातील निर्णय घेण्यात येईल. अद्याप पक्षप्रवेशाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

– सह्याद्री चिमणराव कदम.


Back to top button
Don`t copy text!