फलटण तालुक्याच्या राजकीय पटलावर ‘महाविकास आघाडी’ टिकणार कां?; आगामी निवडणूकांवरुन राजकीय वर्तृळातून तर्कवितर्कांना उधाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. १० : राज्याचा कारभार हाकणार्‍या महाविकास आघाडीची नुकतीच वर्षपूर्ती झाली. विधानसभा निवडणूकीत सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस असे अनोखे समीकरण जुळल्याने भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर व्हावे लागले. नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणूकीच्या निकालावरुन राज्यपातळीवर तरी ‘महाविकास आघाडी’त अजून तरी एकजूट असल्याचे स्पष्ट झाले. मात्र अशीच एकजूट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमधून दिसून येईल कां? आगामी काळात फलटण तालुक्यात हे तिन्ही पक्ष एकदिलाने काम करतील कां? येणार्‍या ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूका ‘महाविकास आघाडी’ म्हणूनच लढवल्या जाणार कां? असे एक ना अनेक सवालांवर  तालुक्यातील राजकीय वर्तुळासह फलटण शहरातील चौकाचौकात, गावागावातील पारांवर तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

आगामी वर्षामध्ये फलटण तालुक्यामध्ये निवडणुकांचे बार उडणार असून त्यामध्ये फलटण तालुक्यातील सुमारे 80 ग्रामपंचायती, फलटण नगरपरिषद व त्यानंतरच काही महिन्यांमध्ये सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. सध्याचे तालुक्याचे राजकीय चित्र पाहता सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. असे असताना राज्यपातळीवरचा महाविकास आघाडीचा धर्म म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेसला सोबत घेवून या निवडणूका लढवणार कां? यावरुन तालुक्यात चर्चा रंगताना दिसत आहेत.

सन 2021 मध्ये पहिल्या सत्रात फलटण तालुक्यातील सुमारे 80 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. तर दुसर्‍या सत्रात फलटण नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे याच निवडणूकांमधून महाविकास आघाडी की पक्षपुरस्कृत पॅनेल बनवून स्वतंत्र निवडणूका याचे उत्तर मिळणार आहे. सद्य स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बलाबल तालुक्यात सर्वाधिक असले तरी माढा लोकसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली तालुक्यात भाजपाची ताकदही वाढत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असाच जोरदार सामना या निवडणूकीच्या रिंगणात पहायला मिळेल असे अनेकांचे मत आहे. तथापी, महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस यांना सोबत घेतल्यास निश्‍चितच भाजपला अतिशय तगडे आव्हान उभे राहिल पण उमेदवारीत मोठी चढाओढ निर्माण होईल. शिवाय फलटण शहरातील सामाजिक कार्यकर्ते एकत्रित येऊन तिसरी आघाडी करून राजे गटासह खासदार गटाला टक्कर देणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणूका दुरंगी, तिरंगी की चौरंगी होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!