भाजपा माढा लोकसभेचे रणशिंग फलटणमधून फुंकणार ?; ना. देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याकडे मतदारसंघाचे लक्ष

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 13 जानेवारी 2024 | फलटण | प्रसन्न रुद्रभटे | राज्यामधील सर्वच लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे. भाजपाचे नेते व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे माढा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत असून फलटण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी माढा लोकसभेचे रणशिंग हे फलटण मधून फुंकले जाणार कि काय ? अशा चर्चा सध्या मतदारांमध्ये सुरु झाल्या आहेत.

मागील लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभेचे उमेदवारी देऊन ते निवडून सुद्धा आले होते. त्यानंतर त्यांनी हजारो कोटींचा निधी मतदार संघामध्ये मंजूर करून आणला असून आगामी काही महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना संधी मिळणार की अन्य उमेदवाराला भारतीय जनता पार्टी तिकीट देणार याकडे आता मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कामकाज हे संपूर्ण देशामध्ये असणाऱ्या खासदारांमध्ये अव्वल असून देशातील खासदारांचा जर अहवाल तयार केला तर त्यामधील टॉप १० खासदारांमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव आहे; असे म्हणून एकप्रकारे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या तिकिटावर शिक्कामोर्तब केला होता. परंतु तेच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे पंढरपूर येथे बोलताना म्हणाले आहेत कि; मी सलग १५ वर्षे आमदार म्हणून कामकाज केले होते; त्यातील मागील काळामध्ये मंत्री म्हणून सुद्धा काम केले होते. परंतु पक्षाने मला तिकीट न देता पक्ष संघटनेत काम करण्याचे सांगितले; त्यामुळे भाजपा पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील; तोच निर्णय सर्वांना अंतिम मानून काम करावे लागेल; असे स्पष्ट केले आहे.

खासदार रणजितसिंह यांची प्रबळ दावेदारी

गत निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आपल्या पदरामध्ये पाडत रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढा लोकसभा मतदारसंघांमधून निवडून गेले. ते निवडून गेल्यानंतर संपूर्ण मतदारसंघांमध्ये त्यांनी हजारो कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. गत निवडणुकीतमध्ये जेष्ठ नेते शरद पवार हे स्वतः माढा लोकसभा पुन्हा लढवणार अश्या चर्चा सुरु होत्या. त्यांनी निवडणूक लढवली नाही परंतु माढा लोकसभा हा शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध होता. मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर माढा लोकसभेचे प्रथम खासदार हे स्वतः शरद पवार होते. त्यानंतर राष्ट्रवादी कडून २०१४ साली शरद पवार यांच्या नेतृत्वात विजयसिंह मोहिते – पाटील हे निवडून गेले होते. अश्या ह्या भक्कम असलेल्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकविण्याचे काम हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.

धैर्यशील मोहिते – पाटील यांनी कंबर कसली

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने युवा नेते व विजयसिंह मोहिते – पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते – पाटील यांनी कंबर कसली असून गतकाही महिन्यांपासून धैर्यशील मोहिते – पाटील हे संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. मोहिते – पाटील समर्थक तर सोशल मीडियाच्या माध्यमातून भावी खासदार म्हणून धैर्यशील मोहिते – पाटील यांचा प्रचार सुद्धा करायला लागले आहेत. गत निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोहिते – पाटील गटाने मदत करून एकट्या माळशिरस विधानसभा मतदारसंघांमधून तब्बल एक लाखाची आघाडी लोकसभेला दिली होती. परंतु आता तशी परिस्थिती नाही. मोहिते – पाटील कुटुंबीयांच्या वतीने धैर्यशील मोहिते – पाटील हे आगामी लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. दिवाळीमध्ये धैर्यशील मोहिते – पाटील यांनी स्वतः आगामी माढा लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी कडून आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले होते.

परंतु गत निवडणुकीच्या वेळेस माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांची मोलाची साथ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळाली होती. परंतु आता तसे चित्र बघायला मिळत नाही. काही अपवाद वगळता मोहिते – पाटील गट व खासदार गट हे दोन्ही गट आता समोरासमोर सुद्धा यायला तयार नाहीत. त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पार्टी पुन्हा संधी देणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणूक ही काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे. त्यामध्येच सर्वच राजकीय पक्ष हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागलेले आहेत. भारतीय जनता पार्टी नक्की कोणाला लोकसभेची उमेदवारी देणार आहे; यावर पुढील सर्वच गणिते अवलंबून आहेत. भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे माढा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून ते नक्की कोणती घोषणा करणार ? याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.


Back to top button
Don`t copy text!