खान्देशचे ‘मांडे’ ते कुठून आले…!


मराठवाड्यातल्या लोकपरंपरेत पुरणपोळीला अनन्यसाधारण महत्व… मुळातच हा प्रदेश फार सुपीक नसला तरी सपाट. त्यामुळे इथल्या पीक पध्दतीत सगळ्या प्रकारचे कडधान्य, डाळवर्गीय पीकं मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे इथे मानवी वसाहती खूप प्राचीन काळापासून सुरू झाल्याचे इतिहास सांगतो… सिंधू संस्कृतीनंतरच्या १६ महाजनपदात दक्षिणेतलं एकमेव महाजनपद हे गोदावरी खोर्‍यातलं ‘आश्मक’, म्हणजे आजच्या मराठवाड्याला लागून असलेलं, मांजरा नदीच्या काठावरचं बोधन… आपल्या आजच्या मराठीची मूळ जननी भाषा ‘महाराष्ट्री प्राकृत’, ही पण गोदावरी खोर्‍यातील. याचा संदर्भ सातवाहन राजा हलाच्या ‘गाथा सप्तशती’ मध्ये सापडतो… मराठीच्या उत्क्रांत अवस्थाही इथेच सापडतात. त्यात विवेकसिंधू, लीळाचरित्र आणि भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी, ह्या सर्व ग्रंथांच्या कर्त्यांचा जन्म गोदावरी खोर्‍यातलाच… हा सगळा इतिहास सांगण्यामागे एक गोष्ट दडली आहे, ती भाषा उत्पत्तीची आणि खाद्यसंस्कृतीची…

आज मी गुढीपाडव्यानिमित्त ‘मांडे’ खाल्ले, यापूर्वीही मी मांडे खाल्लेले आहेत. पण, आज स्वाद घेतला तो खान्देशात म्हणजे जळगावमध्ये… मग विचार केला, हा पुरणपोळीचाच प्रकार इकडे कसा प्रसिद्ध झाला असावा… याच्या खोलात गेल्यास काही पुसटसे संदर्भ हाती लागले… तुम्हा सर्वांना माहिती आहेच, ‘आपेगाव’ हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील गाव आहे. हे संत ज्ञानेश्वर यांचे जन्मगाव होय. पैठण तालुक्यापासून आपेगाव १० किलोमीटर अंतरावर, गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. ज्ञानेश्वरांची ३ भावंडे होती. सर्वात मोठे निवृत्तीनाथ, त्यानंतर सोपान आणि शेवटची मुक्ताबाई… बाकी विठ्ठलपंताचा इतिहास सर्वांना माहिती आहे.. त्यात जात नाही. मी थेट ‘मांडे’ या विषयावर येतो..

एक दिवस निवृत्तीनाथांना ‘मांडे’ खाण्याची इच्छा झाली. हा पदार्थ मातीच्या खापरावर बनवतात. त्याला लागणारं खापर घरी नव्हतं. त्यामुळे मुक्ता ते खापर घेण्यासाठी कुंभारांकडे गेली. विसाजीपंतांनी (पूर्वीचे विसाजीपंत सावकार, मांडे दृष्टांतानंतरचे संत विसोबा खेचर) या भावंडांना काही द्यायचं नाही, असा दम दुकानदारांना भरला होता. त्यामुळे मुक्ताला जागोजागी फिरूनसुद्धा ते खापर मिळालं नाही.

मुक्ताई हिरमुसून घरी आली. आपल्या दादाला हवा तो पदार्थ बनवता येणार नाही, याचं तिला फार दुःख झालं. तिचा पडलेला चेहरा पाहून ज्ञानेश्वरांनी काय झालं ते विचारलं. तिने मांडे करायचे आहेत आणि कोणी खापरच दिलं नाही, हे सांगितलं. ज्ञानेश्वर म्हणाले, बस एवढंच ना? मग कशाला एवढी दुःखी होतेस? कर तू तयारी. छान मांडे करू आपण. ज्ञानादादाने आश्वासन दिल्यावर ते तो पूर्ण करेलच याची मुक्ताला खात्री होती. मुक्ता उत्साहात तयारीला लागली. तयारी झाल्यावर तिला मांडे खापरावर थापून गरम करून बनवायचे होते. तिने दादाला विचारलं… कुठंय रे दादा खापर, कशावर थापू मी मांडे?

दादा म्हणाला, थाप माझ्या पाठीवर. ज्ञानेश्वर असं म्हणून ओणवे झाले. त्यांची पाठ तापायला लागली. एकदम गरम होऊन ती लालेलाल झाली. मुक्ताने आनंदाने दादाच्या पाठीवर मांडे थापले. अशी ती गोष्ट आहे (सत्य कि असत्य यात मी जात नाही). ह्या गोष्टीचा कालखंड आहे १२ व्या शतकाचा उत्तरार्ध. त्यात मांडे आले आणि पुढे ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली… नामदेव व इतर भक्तगण यांच्यासमवेत संत मुक्ताबाई आपेगावी पोहोचल्या. तेथून पुढे त्या वेरूळ, घृष्णेश्वर येथे जाऊन मुक्काम केला. पुढील वाटचालीच्या दरम्यान ‘ज्ञानबोध’ ग्रंथाची निर्मिती झाली. पुढे त्या जळगाव जिल्ह्यात आल्यानंतर ‘वैशाख वद्य दशमी’ या दिनी मुक्ताबाई तापीतीरी कोथळी (आजचे मुक्ताईनगर), जिल्हा जळगाव येथे स्वरूपाकार झाल्या. त्यांच्याबरोबर त्यांचे जीवनकार्यही सोबत आले. निवृत्तीनाथाच्या आवडीचे मांडे मुक्ताबाईने केले. पुढे ते खान्देशच्या खाद्यसंस्कृतीचा भाग झाले असावे. १५ व्या शतकात याच मांड्यावर पुन्हा संत एकनाथ महाराजांनी आपल्या अभंगातून भाष्य केले..

‘बोले माऊली रडू नको,

मुक्ता देतो तुला तापवुनी तवा |

जठ राजाला हुकुम केला,

जठ अग्नी धावोनी आला ॥

घेई पाठीवरी भाजोनी मांडे,

विठ्ठल विठ्ठल डोलू लागला..!!

मी मराठवाड्यातून खान्देशात नोकरीनिमित्त आलो… आज चैत्र गुढीपाडव्याला तो खापरावली मांडे पोळी खाल्ली आणि आजपर्यंत अनेकांनी मनातल्या मनात खाल्लेल्या ‘मांडे’ना शब्दरूप दिले..!!

@ युवराज पाटील


Back to top button
Don`t copy text!