काय सांगता! दुष्काळी तालुक्यात हाेणार ऊसाची विक्रमी लागवड


 

स्थैर्य, कुकुडवाड, दि.२०: माण तालुक्‍यात गेल्या वर्षीसह यंदा मॉन्सूनसह परतीच्या पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे तालुक्‍यातील कुकुडवाड परिसरातील ओढे दुथडी वाहत आहेत. लघुपाटबंधारे विभागाचे साठवण तलाव, छोटे-मोठे बंधारे, तळ्यांत चांगला पाणीसाठा झाल्याने गाव शिवारांत मोठे क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी ऊस लागवडीकडे वळल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रमी ऊस लागवड होण्याची चिन्हे दिसत आहेत. 

सन 2020 हे वर्ष हे कोरोना रोगाचे तसे मोठ्या प्रमाणावर पावसाचे म्हणावे लागेल. त्यात माण तालुक्‍यात तर सप्टेंबर आणि ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओढे, तलाव, सिमेंट बंधारे, तुडुंब भरून ओसंडून वाहत आहेत. तालुक्‍यात महत्त्वाचे असलेले लघू प्रकल्प गंगोती, ढाकनी, महाबळेश्वरवाडी, जांभुळणी आदी तलावांच्या कार्यक्षेत्रात जोरदार पावसाने पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला असून, तलाव तुडुंब भरले गेले; पण यामुळे खरीप हंगामातील शेतपिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेती उत्पादन तोट्यात गेले. आता पाणीसाठा आहे म्हणून तालुक्‍यातील बागायती भाग असणाऱ्या लाभक्षेत्रातील प्रकल्प तलावांच्या पट्ट्यात शेतकरी नगदी पीक म्हणून ऊस लागवड मोठ्या प्रमाणावर करताना दिसत आहेत. खरीप हंगामातील पिकांची नुकसान झाले असले, तरी पाण्याची शाश्वती झाल्यामुळे ओढ्या काठावरील आणि साठवण तलाव क्षेत्रातील असलेला भाग सिंचनाखाली आला आहे. या भागात नगदी पीक म्हणून उसाची मोठ्या प्रमाणात लागवड सुरू झाली आहे.

शेतकरी ऊस लागवड व रब्बीच्या पेरणीत व्यस्त

परतीच्या पावसाने खरिपाचे होत्याच नव्हते करून टाकले. या सकंटातून सावरत रब्बीची पेरणी, ऊसलागवड या कामाला वेग आला आहे. गावटोळी करून ऊस तोडणीस जाणारे मजूर ऊस लागवड, रब्बी पेरणीच्या कामाकडे वळले असल्याने मजूर टंचाईला सामोरे जावे लागत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!