किल्ले अजिंक्‍यताऱ्यावर होणार सातारा पालिकेची सभा


 

स्थैर्य, सातारा, दि.२०: सातारा नगरपालिकेच्या विशेष सभेचे ता. 12 जानेवारी रोजी किल्ले अजिंक्‍यताऱ्यावर आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्याची राजधानी म्हणून साताऱ्याची स्थापना छत्रपती शाहू महाराज यांनी केली होती. त्यांचा राज्याभिषेक किल्ले अजिंक्‍यताऱ्यावर झाला होता. या राज्याभिषेक दिनाच्या औचित्याने पालिका सभेचे आयोजन किल्ल्यावर करण्याच्या सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिकेस केल्या होत्या. यानुसार या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक 12 जानेवारी रोजी किल्ले अजिंक्‍यताऱ्यावर झाला होता. हा दिवस शिवप्रेमी स्वाभिमान दिन म्हणून साजरा करतात. या दिनाच्या औचित्याने पालिकेच्या विशेष सभेचे ता. 12 जानेवारी रोजी आयोजन किल्ल्यावर करण्याच्या सूचना खासदार उदयनराजे यांनी पालिकेस केल्या व त्याची घोषणा त्यांनी नुकतीच केली. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजित बापट, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, शिवकाल अभ्यासक डॉ. संदीप महिंद, शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक प्रभावळकर, संस्थापक सुदाम गायकवाड, कन्हैय्यालाल राजपुरोहित, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, अमोल सणस, विक्रमसिंह पाटील, प्रशांत पवार आदी उपस्थित होते.

साताऱ्यात शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने दर वर्षी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येतो, तर गेल्या आठ वर्षांपासून सातारा स्वाभिमान दिन 12 जानेवारीला आयोजिण्यात येतो. हद्दवाढीनंतर किल्ले अजिंक्‍यताऱ्याचा समावेश पालिकेत झाला आहे. यामुळे या वेळी होणारी पालिकेची विशेष सभा किल्ल्यावर घेण्यात येत असून, तसे आयोजन करणारी सातारा नगरपालिका राज्यातील पहिली पालिका ठरली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!