दैनिक स्थैर्य | दि. 19 जानेवारी 2024 | फलटण | मुलांनी बनवलेल्या विविध वस्तूंमधून त्यांच्यामध्ये असलेली सर्जनशील कल्पना शक्तीचे दर्शन होत आहे. त्यामुळे हे प्रदर्शन मुलांच्या कलात्मक विकासाला गती देणारे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रयोग करून दाखवून सर्वांना विज्ञानाच्या जादूचे दर्शन घडवले. हे पाहून फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी मुलांच्या हस्तकलेचे आणि कल्पनाशक्तीचे प्रांताधिकारी विशेष कौतुक केले.
महात्मा एज्युकेशन सोसायटीचे श्रीराम विद्याभवन फलटण या प्रथामिक शाळेचा आठवडा बाजार, कला व विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव तथा जेष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, श्रीराम विद्याभवन शाळा समितीचे अध्यक्ष रविंद्र बर्गे, चतुराबाई शिंदे बालक मंदीर शाळा समितीचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर पिसाळ, जगदीश पाटील, विवेक शहा, श्रीराम विद्याभवनचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भिवा जगताप यांच्या उपस्थितीत पार पडले.
जीवन व्यवहार आणि कल्पना शक्तीला वाव मिळावा,तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते असे प्रशालेचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांनी सांगितले.
यावेळी मुलांनी भाजी, फळे, स्टेशनरी, ज्वेलरी, खाऊचे स्टॉल लावले होते. त्यात फळांचे गाव धुमाळवाडी हा फळांचा स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डनच्या अध्यक्षा सुनीता कदम, उज्वला निंबाळकर, सुनंदा भोसले, स्वाती चोरमले, शिवानी चिटणीस, शरयू चिटणीस यांनी प्रदर्शनास भेट देऊन खरेदीचा आनंद घेतला.
तसेच पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रदर्शन यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.