कृषी उद्योजकांनी निर्माण केलेली संपत्ती देशाला समृद्ध, सुरक्षित व सक्षम बनवते – विलास शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३ मे २०२३ | फलटण |
कृषी उद्योजकांनी निर्माण केलेली संपत्ती देशाला समृद्ध, सुरक्षित व सक्षम बनवते. म्हणून कृषी उद्योजकता विकसित करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सह्याद्री फॉर्म्स प्रा. लि., नाशिकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विलास शिंदे यांनी केले.

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय फलटण, श्रीराम सहकारी कारखाना लि. फलटण आणि श्री दत्त इंडिया प्रा. लि. साखरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य शेतकरी मेळावा श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल येथे पार पडला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून विलास शिंदे बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्ज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी जि.प. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले. प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी केला. यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त जवाहर सहकारी कारखाना लि.चे उपाध्यक्ष श्री. बाबासाहेब चौगुले, संचालक सदस्य श्री. कलापन्ना आवाडे आणि श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखरवाडीचे उपाध्यक्ष श्री. मृत्यूंजय शिंदे यांच्याकडून विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमातील प्रमुख वक्ते सह्याद्री फॉर्म्स प्रा. लि., नाशिकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विलास शिंदे यांनी ‘कृषि उद्योजिकता विकास ही काळाची गरज’ याबाबत शेतकर्‍यांना उद्देशून संबोधन केले. ते म्हणाले की, कृषि उद्योगासंदर्भात सरकारचे धोरण चांगले असले तरी त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा तितकीच सक्षम असेल, असे म्हणता येणार नाही. हे आपल्याकडे दिसून येत आहे आणि याचा त्रास सर्वच उद्योग, व्यापार, व्यवसायांना होत आहे. त्यातून स्टार्ट-अप्स सुटले, असे पूर्णतः म्हणता येणार नाही. आर्थिक, सामाजिक उन्नती आणि विकासामध्ये उद्योग, व्यापार, व्यवसायांचे महत्त्व, योगदान मोठे आहे. कृषि उद्योग निर्माण करणार्‍या कृषि उद्योजकांच्या उद्योजकतेतूनच देशाची आर्थिक प्रगती होते. कृषि उद्योजक उद्योग सुरू करतो, अनेकांना रोजगार देतो, आर्थिक व्यवहारातून समाज, सरकार यांना कररूपाने एकंदर सामाजिक व्यवस्था चालवण्याकरीता आर्थिक मदत करतोच. पण, समाजातील अनेकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने त्यांचा उदरनिर्वाह करण्याकरिता मदत करतो. कृषि उद्योजक संपत्ती निर्माण करतो व हीच संपत्ती देशाला समृद्ध, सुरक्षित व सक्षम बनवते.

विलास शिंदे पुढे म्हणाले की, जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्रात राबविण्यात येणार्‍या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांची मुख्य उद्दिष्टे शेतकर्‍यांची उत्पादकता वाढविणे, निव्वळ उत्पन्न वाढविणे, शेतकर्‍यांना कृषी पणन सुविधा पुरविणे ही आहेत. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रकल्पांतर्गत अनेक घटक राबविले जातात. शेतकर्‍यांच्या शेतमालाला गुणवत्तापूर्ण बनविणे, शेतमालाचे काढणी पश्चात व्यवस्थापन, प्रक्रिया, मूल्यवर्धन, कृषी मालाची थेट विक्री इत्यादीच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे निव्वळ उत्पन्न वाढविणे व कृषी क्षेत्रात उद्योजकता वाढविण्यासाठी एम.ए.सी.पी. अंतर्गत कृषी उद्योजकता विकास कार्यक्रम हा घटक राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा उद्देश, अर्थसहाय्य, लाभार्थी निवड, अटी-शर्ती, अंमलबजावणी आदींबाबतचे सविस्तर मार्गदर्शन या लेखाच्या दोन भागांद्वारे करण्यात येत आहे. भविष्यात शेतकर्‍यांनी अधिकतम अशा उपक्रमांचा लाभ घेवून कृषि उद्योजकता विकसित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

‘ऊस भूषण’ शेतकरी श्री. सौरभ कोकीळ यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना ऊस शेतीतील ‘होमवर्क’, ऊस शेतीतील बारकावे, शास्त्रीय दृष्टिकोन, आधुनिक तंत्रज्ञान व अथक प्रयत्न यांचा मिलाफ घडवत व्यवस्थापन सुधारण्याला भर द्यावा. विविध प्रयोग सुरू करावेत, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्रे, कृषी विज्ञान केंद्र, ऊस संशोधन केंद्रांना भेटी द्याव्यात, त्यातून तंत्र व ज्ञान वाढवावे.

जमिनीची चांगल्या प्रकारे मशागत, उभी आडवी खोल नांगरट, पारंपरिक तीन फूट सरीऐवजी ४.५ ते ५ फूट रुंद सरी पद्धतीचा अवलंब करावा. पायाभूत बियाण्यांपासून तयार केलेल्या बेणेमळ्यातील शुद्ध बियाण्यांचा वापर करावा. मातीची सुपीकता व एकरी उत्पादकता वाढण्यास मदत होईल. ऊस व्यवस्थापन करताना को-८६०३२ वाणाचा वापर, माती परीक्षण महत्त्वाचा मुद्दा आहे. ते साधारण दरवर्षी करण्याचा प्रयत्न असतो, त्यातून जमिनीत कोणती अन्नद्रव्ये कमी किंवा जास्त आहेत हे समजते. त्यातून आर्थिक बचत होण्याबरोबर जमिनीचे आरोग्यही चांगले राहते. रासायनिक खतांचा भरमसाट वापर न करता जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवितात. त्याचे प्रमाण १.२ टक्क्यापर्यंत म्हणजे चांगल्या प्रमाणात असावे. हरभर्‍याचा बेवड घ्यावा. त्यामुळे पिक फेरपालट होते. सहा ते सात ट्रेलर एकरी याप्रमाणे शेणखताचा वापर दर तीन वर्षांनी करावा. उसात पॉवर टिलरच्या साह्याने बाळभरणी केल्यानंतर ताग, धैंच्या यांसारख्या हिरवळीच्या खतांची लावण होते. मोठ्या बांधणीवेळेस ही पिके गाडून घ्यावीत. दर्जेदार व नऊ ते दहा महिन्याच्या दर्जेदार बेण्याचा वापर करावा. बेणे मळा स्वतःचा असावा. शेतकर्‍यांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी ‘व्हीएसआय’ येथून मूलभूत बेणे घ्यावे. कार्बेन्डाझिम व क्लोरपायरिफॉसची बेणेप्रक्रिया करावी. लागवडीनंतर ३ दिवसांनी विद्राव्य खतांचा वापर सुरू करावा, तो दर पंधरा दिवसांच्या अंतराने दहा महिने सुरू राहतो. यात पोटॅश, १२-६१-० आदींचा वापर होतो. लागवडीनंतर २५ दिवसांपर्यंत ‘गॅप फिलिंग’ करावी. बेसल डोसमध्ये डीएपी, पोटॅश, निंबोळी पेंड, गंधक व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. अशा प्रकारे सुधारित ऊस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकर्‍यांनी उसाचे भरघोस उत्पादन घ्यावे, असे सौरभ कोकीळ यांनी शेतकर्‍यांना सांगितले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सहकार क्षेत्र आणि शेतकरी यांचा समन्वय, जिल्हा सहकारी बँकेचा आधुनिक शेतीमध्ये असणारा महत्त्वाचा वाटा या विषयावर उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

या शेतकरी मेळाव्यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शेतकरी मेळाव्याचे अध्यक्षस्थान कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे माजी अध्यक्ष श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी भूषविले.

मेळाव्यास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट लि. फलटणचे संचालक सदस्य श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लि. साखरवाडीचे उपाध्यक्ष श्री. मृत्यूंजय शिंदे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, श्री. डी. के. पवार, सौ. रेश्मा भोसले, श्री. धनंजय पवार, ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंदभाई मेहता, श्री. अमोल नाळे, फलटण व पंचक्रोशीतील प्रगतशील शेतकरी, महाविद्यालयाचे प्राध्यापक व प्राध्यापकोत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रा. सौ. राजश्री शिंदे यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ. जी.बी. अडसूळ यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!