स्थैर्य, सातारा, दि.११ : साता-याला आम्ही राष्ट्रवादीवाचा बालेकिल्ला मानत नाही. आमच्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांचे आम्ही गुलाप पुष्प देऊन स्वागत केले. राष्ट्रवादीकडे पैसा असल्याने ते पैसे देऊन स्वागत करीत असतील असे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी आज (रविवार) येथे नमूद केले. खासदार गिरिश बापट हे आज सातारा दाै-यावर आले आहेत. त्यांनी सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय ग्रामपंचायत निवडणूकीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांच्याशी माध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला.
ते म्हणाले, सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप प्रभावीपणे उतरली आहे. बहुतांश ठिकाणी आमचे कार्यकर्ते, सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत. दरम्यान बापट यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यामध्ये आम्ही सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानत नसल्याचे नमूद केले. आमदार रोहित पवार यांनी बिनविरोध ग्रामपंचायतींना पैसे देत आहेत, तसे भाजपकडून काय दिले जाणार आहे, या प्रश्नावर श्री. बापट यांनी राष्ट्रवादीकडे पैसा आहे. त्यामुळे ते पैसा देऊन स्वागत करतात. आम्ही बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले आहे.
भाजपच्या बड्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत राज्य सरकारने कपात केली आहे. याबाबत बापट म्हणाले माजी मुख्यमंत्री विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खास सुरक्षेची गरज नाही. कार्यकर्ता हीच त्यांची सुरक्षितता आहे.