‘अध्यक्ष’ तुमचे जाणे आम्हाला खरंच परवडणारे नाही…..


श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या समवेत प्रशांत नाळे यांचे संग्रहित छायाचित्र.

स्थैर्य, फलटण दि.22 : राजे गटाचे कट्टर कार्यकर्ते, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत रघुनाथ नाळे (रा.दुधेबावी, ता.फलटण) यांचे दि.31 जानेवारी 2021 रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी फलटण तालुका कोरेगाव विधानसभा मतार संघ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (राजे गट) आणि श्रीमंत रामराजे प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आज दि.22 रोजी फलटण शहरातील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने प्रशांत नाळे यांच्या आठवणींना या लेखाद्वारे उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीमंत रामराजे प्रतिष्ठानचे संस्थापक कार्याध्यक्ष सिद्धेश माने यांनी…..

खरं तर हा लेख लिहिण्याचे धाडसच होत नाही; कोणत्याही मित्राला आपल्या मित्राबद्दल अशा प्रसंगामुळे लिखाण करण्याची वेळ येणे हेच मुळात दुर्दैव आहे. आसवांना वाट मोकळी करुन देत हिंमतदाखवत हा लेख लिहण्याचा प्रयत्न केला आहे, कारण एवढचं की मित्रा, तुझं जाणं आम्हाला कधीच परवडणार नाही प्रशांत.

सतत हसतमुख चेहरा, लहान असो वा मोठा प्रत्येकाला अहो – जावो बोलवणे, आदरणीय ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यापासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांशी जिव्हाळ्याचा परिचय, ना.श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे यांचे कट्टर समर्थक म्हणून सर्वत्र सुप्रसिद्ध, फलटण नव्हे तर संपूर्ण सातार्‍या जिल्ह्यामध्ये ‘अध्यक्ष’ या नावाने ओळख, मात्र हे व्यक्तीमत्त्व आज या जगात नाही यावर अजूनही विश्‍वास बसत नाही.

प्रशांतच्या अकस्मित जाण्याने विद्यार्थी संघटना, श्रीमंत रामराजे प्रतिष्ठानमध्ये न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे. प्रशांतचा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष हा प्रवास वाखाणन्याजोगा होता. पुण्यामध्ये श्रीमंत रामराजे प्रतिष्ठान या संघटनेची स्थापना प्रशांतने केली होती. या संघटनेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात वास्तव्यास असणार्‍या फलटणकरांना एकत्र आणून त्यांच्या समस्यांचे ना.श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमातून निराकरण करणे हा त्यामागे प्रशांतचा उदात्त हेतू होता. त्यामुळे कमी वयात अनेक सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवण्यात प्रशांतला यश आले होते. कित्येक युवकांसाठी त्यानी उत्तम मार्गदर्शकाची भूमिका बजावली होती. अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाच्या अडीअडचणी तो सोडवत होता. त्यामुळे आज जरी प्रशांत आपल्यामध्ये नसला; तरी त्याच्या कार्याच्या आठवणी नेहमीच सर्वांच्या स्मरणात राहतील.

प्रत्येकाच्या हाकेला नेहमीच ओ देणारा प्रशांत आज या जगात नाही. दुसर्‍याच्या अडीअडचणी सोडवणारा, दुसर्‍याच्या दु:खात सहभागी होणारा, त्याला धीर देणारा, दुसर्‍याच्या भल्यासाठी सदैव कार्यरत राहणारा आपला जिवलग मित्र स्वत:ची दु:खे, अडअडचणी कोणालाही न सांगता; असा अचानक का निघून गेला? हा प्रश्‍न मात्र सदैव आमच्यासारख्या मित्रांच्या मनात घर करुन राहणार हे निश्‍चित.

या दु:खातून सावरण्याची ताकद ईश्‍वर त्याच्या कुटूंबियांना देवो. जे झाले ते अत्यंत दु:खद आहे. अध्यक्ष तुमचे जाणे आम्हाला खरचं परवडणारे नाही.

  • सिध्देश माने,
    कार्याध्यक्ष, श्रीमंत रामराजे प्रतिष्ठान

Back to top button
Don`t copy text!