दैनिक स्थैर्य | दि. २७ नोव्हेंबर २०२३ | बारामती |
हरित क्रांतीच्या नावे आपण स्वयंपूर्ण तर झालोच किंबहुना निर्यातदारदेखील झालो; परंतु उत्पादनवाढीच्या या प्रयोगांमध्ये आपण अन्नधान्याच्या गुणात्मक दर्जाचा विचार अथवा त्यायोगे आपल्या आरोग्याच्या किंवा जमिनीच्या सुपीकतेच्या र्हासाचा विचार करत गेलो का, असा अंतर्मुख करणारा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य भैय्याजी जोशी यांनी उपस्थितांना विचारला.
गोविज्ञान संशोधन संस्था आणि दादरानगर हवेली मुक्तिसंग्राम समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘११ वे श्रद्धेय मोरोपंत पिंगळे गोसेवा पुरस्कार २०२३’ अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या प्रांगणातील जिवराज सभागृहात नुकतेच पार पडले. त्यावेळी भैय्याजी जोशी बोलत होते.
यावेळी प्रथम पुरस्कार बगलदरा, बलसाड (राजस्थान) येथील कॅन्सर रुग्णालयाचे प्रवर्तक गोमूत्र औषधी विशेषज्ञ वैद्य श्री. चंदनमलजीं घोटा यांना तर काश्मीरमधील बारामुल्ला प्रांतामध्ये गो-संगोपनाचे काम करणार्या नगिना मोहम्मद अन्वर खान यांना द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तिसर्या जिल्हा स्तरावरील स्थानिक पुरस्काराचे मानकरी फलटण तालुक्यातील गो आधारित सेंद्रिय शेतीचे समन्वयक प्रदीप मदने हे होते.
सदर पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक युवकमित्र ह. भ. प. बंडातात्या कराडकर हे प्रमुख अतिथी तर दि माळेगाव सहकारी साखर कारखाना लि. चे चेअरमन अॅड. श्री. केशवराव सर्जेराव जगताप हे अध्यक्ष म्हणून लाभले होते. शेखर मुंदडा, गोसेवा आयोग महाराष्ट्र राज्य, पुरूषोत्तम जगताप, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, प्रशांत काटे, छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर हे प्रमुख उपस्थित होते.
पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर भैय्याजी जोशी उपस्थितांशी बोलताना म्हणाले की, गो आधारित औषधोपचार आणि त्यातून कॅन्सरसारख्या रोगांवर होणारे उपचार तसेच काश्मीर आणि त्यातही बारामुल्लासारख्या विभागात गो सेवेसारखे कार्य करणार्या नगीनाताई हे बदलत्या भारताचे चित्रच नाही तर दुसरे काय? यासारख्या कार्यावर समाजासमोर प्रकाश टाकणे हाच या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचा मूळ उद्देश असतो. तो आजच्या कार्यक्रमाने नक्कीच साधला गेला.
गोसेवा या विषयाची व्याप्ती सांगताना भैय्याजींनी गोभक्त, गोसेवक, गोपालक, गोरक्षक या केवळ चारच शब्दांमध्ये समस्त देशवासीयांना गो सेवेसी जोडून घेतले आणि हरित क्रांतीच्या दुष्परिणामांना टाळण्यासाठी गोआधारित सेंद्रिय शेतीचे सध्या स्थानिक पातळीवर होणारे काम व्यापक करण्याचे आवाहन उपस्थितांसमोर ठेवले.
सदर कार्यक्रमामध्ये सेंद्रिय शेती करणारे शेतकरी तसेच देशी गोवंश संभाळणारे गोपालक यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी वरील संस्थांशी निगडित कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच गोसेवा या विषयावर मनापासून प्रेम करणारे आणि पशूपालक व शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शेठ वाघोलीकर, दयोदय गोशाळेच्या श्रीमती संगीता अतुल शहा, कण्हेरीच्या मारुती मंदिर देवस्थानचे ह. भ. प. लक्ष्मण महाराज कोकाटे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र नाना ढवाण पाटील तसेच गोविज्ञान संशोधन संस्था दादरा नगर हवेली मुक्तिसंग्राम समिती आणि रा. स्व. संघाच्या गोसेवा विभागाचे सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.