उन्हाळ्याआधीच तीव्र पाणीटंचाई; राज्यात टँकरची संख्या दुप्पट, ६११ टँकरने पाणीपुरवठा सुरू

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्यात उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणीटंचाई तीव्र झाली असून एका महिन्यात टँकरची संख्या दुप्पट होऊन ६११ वर पोहोचली आहे.

स्थैर्य,सातारा, दि. १० ऑक्टोबर : तीव्र उन्हाळा सुरू होण्यास अद्याप बराच कालावधी शिल्लक असतानाच राज्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू झाली आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे विहिरी, बोअरवेल आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत झपाट्याने घसरण झाली आहे. त्यामुळे अवघ्या महिनाभरात राज्यातील टँकरची संख्या ३०७ वरून थेट ६११ वर पोहोचली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या १० जिल्ह्यांमधील ५१७ गावे आणि २,१४७ वाड्या-वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक टँकर

पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला असून छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात सर्वाधिक २६३ टँकर सुरू करण्यात आले आहेत. अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यात १५३ टँकरद्वारे १५० गावे आणि ८७४ वाड्यांना पाणी दिले जात आहे. याशिवाय बीड जिल्ह्यात १११ तर सोलापूर जिल्ह्यात ९८ टँकर धावत आहेत. पुणे, नाशिक, सातारा, सांगली, जालना आणि धाराशिव जिल्ह्यांतही पाणीटंचाईची झळ बसू लागली असून टँकरची मागणी वाढली आहे.

बहुतांश खासगी टँकरवर अवलंबून

सध्या सुरू असलेल्या ६११ टँकरपैकी अवघे १५ टँकर सरकारी आहेत, तर तब्बल ५९६ खासगी टँकर भाड्याने घेऊन पाणीपुरवठा केला जात आहे. ऑक्टोबर महिन्यातच ग्रामीण भागात पाणीटंचाईचे सावट गहिरे झाल्याने आगामी काळात प्रशासनासमोरील आव्हाने वाढणार आहेत. केंद्र सरकारच्या आंतर-मंत्रालयीन पथकानेही राज्यातील विविध दुष्काळग्रस्त भागात पाहणी करून पाणी आणि पीक परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!