
थेट WhatsApp वर मिळवा
दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर पुणे मार्केट यार्डात सुकामेव्याच्या दरात मोठी वाढ झाली असून पिस्ता, बदाम, काजू आणि अंजिराच्या किमती कडाडल्या आहेत.
स्थैर्य,सातारा, दि. १० ऑक्टोबर : आगामी दसरा आणि दिवाळीच्या सणासुदीच्या काळात सुकामेवा (ड्रायफूट्स) खरेदी करणाऱ्या नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. घाऊक बाजारात सुकामेव्याची आवक घटल्याने आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे दरात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः पिस्त्याचा दर प्रतिकिलो १,२०० रुपयांवरून थेट १,९०० रुपयांवर पोहोचला आहे. बदाम, काजू आणि अंजिराच्या दरातही मोठी वाढ झाल्याने यंदाच्या सणासुदीच्या खरेदीचे बजेट कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पिस्ता, काजू आणि बदामाच्या दरात प्रचंड वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारातील तुटवडा, आयात शुल्कातील बदल आणि वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे सुकामेव्याच्या किमतीत ही वाढ नोंदवली गेली आहे. पिस्त्याच्या दरात तब्बल ७०० रुपयांची वाढ झाली असून, तो १,९०० रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. याशिवाय चांगल्या दर्जाचा बदाम ८०० ते १,२०० रुपये प्रतिकिलो तर काजू ८५० ते १,४०० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. अंजिराचे दरही १,००० ते १,६०० रुपये प्रतिकिलोच्या घरात पोहोचले आहेत.
सणासुदीच्या काळात बजेट बिघडणार
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुकामेव्याच्या मिठाईला आणि भेटवस्तूंच्या (गिफ्ट पॅक्स) मागणीत मोठी वाढ होते. मात्र, बाजारात आवक कमी असल्याने आणि किमती वाढल्याने यंदा खरेदीवर परिणाम होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आगामी काही दिवसांत आवक वाढल्यास दरात काही प्रमाणात घसरण होऊ शकते, असा अंदाजही मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात आला आहे.





