
थेट WhatsApp वर मिळवा
कॅन्सर उपचाराचा खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारने बिगर-अनुसूचित कर्करोग औषधांच्या ट्रेड मार्जिनवर ३० टक्क्यांची कमाल मर्यादा घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १० ऑक्टोबर : कर्करोगाच्या गंभीर आजाराशी लढा देणाऱ्या लाखो रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कॅन्सरवरील अतिमहागड्या औषधांच्या किमती नियंत्रित करण्यासाठी बिगर-अनुसूचित (नॉन-शेड्यूल्ड) कर्करोग औषधांच्या विक्रीवरील व्यापारी नफ्यावर (ट्रेड मार्जिन) ३० टक्क्यांची कमाल मर्यादा निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कर्करोगाच्या काही महत्त्वाच्या आणि महागड्या औषधांच्या कमाल किरकोळ किमतीत (MRP) थेट ७० टक्क्यांपर्यंत घसरण होणार असून रुग्णांची वार्षिक सुमारे २,५०० कोटी रुपयांची थेट बचत होणार आहे.
११० औषधांचा समावेश आणि नफेखोरीला आळा
औषध निर्माण विभाग आणि नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटीने (NPPA) केलेल्या अभ्यासानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. या नव्या धोरणांतर्गत सुमारे ११० कर्करोग औषधांचा समावेश करण्यात आला असून यात ३५ पेटंट असलेल्या महागड्या औषधांचाही समावेश आहे. औषध निर्मात्यांकडून घाऊक व्यापारी आणि औषध विक्रेत्यांपर्यंत होणाऱ्या पुरवठा साखळीतील अवाजवी नफेखोरीला आळा घालणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. ब्रँडेड, जेनेरिक, देशांतर्गत उत्पादित तसेच आयात केलेल्या सर्व प्रकारच्या बिगर-अनुसूचित कर्करोग औषधांना ही नवी मर्यादा लागू होणार आहे.
१० दिवसांत अंमलबजावणी आणि रुग्णांना मोठा आधार
कॅन्सर उपचारा दरम्यान औषधांवर होणारा मोठा आर्थिक भार कमी करण्यासाठी सरकारने २०१९ मध्ये ४२ औषधांवर अशाच प्रकारची मर्यादा लागू केली होती, ज्यातून रुग्णांचे ९८४ कोटी रुपये वाचले होते. आता या योजनेचा व्यापक विस्तार करण्यात आला असून पुढील १० दिवसांत या नवीन दरांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे पुरवठा साखळीवर कोणताही प्रतिकूल परिणाम न होता रुग्णांना रास्त दरात औषधे उपलब्ध होतील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.





