तेली गल्लीतील पाणीप्रश्न कायमचा सुटला; नगराध्यक्ष समशेरसिंह यांच्या तत्परतेने नवीन पाईपलाईन मंजूर!; कु. सिद्धाली शहांच्या पाठपुराव्याला यश


स्थैर्य, फलटण, दि. २२ मे : फलटण शहरातील तेली गल्ली येथे गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारा अनियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर व पाणीपुरवठा सभापती राहुल निंबाळकर यांची तत्परता आणि स्थानिक नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या भागातील पाणीप्रश्न सोडविण्यात यश आले आहे.

तेली गल्ली भागात नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. या मागणीची त्वरित दखल घेत नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी या ठिकाणी नव्याने पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच येथे नवीन पाईपलाईन बसविण्याचे काम सुरू होणार असल्याने इथला पाणीप्रश्न कायमचा संपुष्टात येणार आहे.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा पिण्याच्या पाण्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवल्याबद्दल तेली गल्लीतील नागरिकांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे. या जलद कार्यवाहीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या वतीने नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला व त्यांचे आभार मानण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!