फलटण: पालखी महामार्गाच्या कामाला वेग – शहराचा चेहरामोहरा बदलणार


फलटण शहरातून जाणाऱ्या अंतर्गत पालखी महामार्गाचे काम आता रात्रंदिवस युद्धपातळीवर सुरू आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार असून, नागरिकांचा याला मोठा पाठिंबा मिळत आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 22 मे : माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या फलटण शहरातील अंतर्गत पालखी महामार्गाच्या कामाला आता मोठी गती मिळाली आहे. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या निर्देशानंतर या महामार्गाचे काम रात्रंदिवस युद्धपातळीवर सुरू असून, यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलून बारामतीच्या धर्तीवर विकास होणार आहे.

आकर्षक स्ट्रीट लाईट आणि वारसा जतन

शहरातून जाणाऱ्या या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक स्ट्रीट लाईट बसवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी शहराचा ऐतिहासिक वारसा आहे, तिथे त्या परिसराला साजेसे स्वतंत्र डिझाईनचे स्ट्रीट लाईट लावले जाणार आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे.

नागरिकांना तात्पुरता त्रास, तरीही मोठा पाठिंबा

हा महामार्ग शहराच्या मध्यवर्ती भागातून जात असल्याने सध्या वाहतूक कोंडीचा आणि जलवाहिनी फुटण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मात्र, यावर नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने दुरुस्ती केली जात आहे. रस्त्याच्या कामामध्ये दोन्ही बाजूंना पिण्याच्या पाण्याची नवी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात नागरिकांना एकाच दाबाने आणि सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. तात्पुरता त्रास असला तरी या दूरदृष्टीच्या प्रकल्पाला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.

उपअभियंता देशपांडे यांच्यामुळे कामाला गती

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून या मार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू होते. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नियमित आढावा बैठकीत ही बाब निदर्शनास आली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता म्हणून अजय देशपांडे यांनी पदभार स्वीकारला आणि संथ चाललेल्या या कामाला गती देऊन ते युद्धपातळीवर सुरू केले.


Back to top button
Don`t copy text!