
थेट WhatsApp वर मिळवा
राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, मतदारांच्या मार्गदर्शनासाठी ‘१९५०’ हा विशेष हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १६ ऑक्टोबर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी प्रक्रियेला अधिक वेग दिला आहे. राज्यातील सर्व पात्र नागरिकांना मतदार यादीत आपले नाव नोंदवता यावे किंवा नावातील त्रुटी दूर करता याव्यात, यासाठी राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत नागरिकांना सहज माहिती उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे यासाठी ‘१९५०’ ही हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे.
विशेष शिबिरांचे आयोजन
या विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून १७, १८ तसेच २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना नवीन नाव नोंदणी, वगळणी किंवा पत्ता बदलासाठी अर्ज करणे सोपे जाणार असून बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांचे अर्ज स्वीकारणार आहेत.
युवा मतदारांचा सहभाग वाढविण्यावर भर
पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण वर्गाला प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. पात्र नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेऊन आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर भेट द्यावी आणि मतदार यादीतील आपले नाव निश्चित करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.





