विपश्यना : एक अलौकीक साधना


विपश्यना केल्यानंतर माणसाच्या वागणुकीत बदल होतो हे ऐकून होते. ब-याच वर्षांपासून विपश्यना करण्याची इच्छा होती. ती जानेवारी २०२४ मध्ये पूर्ण झाली.

विपश्यना ही मुळ दहा दिवसांची साधना आहे. हिचे मुळ तत्व म्हणजे अहिंसा, शील आणि मौन. या तिन्हीद्वारे मनातील सर्व विकार कायमस्वरूपी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो.

हजारो वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी सांगितलेली ही साधना मानवाच्या मनावर विजय मिळवण्यासाठी फायदेशीर ठरत.आहे. ही करत  असताना  काही शारीरिक त्रास होतो, परंतु यावर मात करुन ही साधना पूर्ण केल्यानंतर सकारात्मक बदल नक्कीच घडून येतो.

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें। 

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥ 

जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें। 

जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥ 

स्वतःच्या श्वासापासून सुरुवात करुन स्वतःच्या मनापर्यंत कसे जायचे हे या साधनेद्वारे शिकवले जाते. पहिले दोन दिवस श्वासाचा मार्ग कसा आणि त्याद्वारे होणा-या संवेदना यांचा अभ्यास करण्यात येतो. त्यानंतरच्या दिवसात आपल्या मनाने डोक्यापासून पायापर्यंत आणि पायापासून डोक्यापर्यंत प्रत्येक अवयवाचे निरीक्षण करावयास शिकवतात. यामुळे काय होतं तर मनात अनेक वर्षांपासून साचून राहिलेले चांगले आणि वाईट विचार शारीरिक बलांमधून बाहेर पडतात. पण त्यामुळे आपण अधिक या साधनेसाठी प्रबळ होतो.

मना वासना दुष्ट कामा न ये रे। 

मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥ 

मना धर्मता नीति सोडूं नको हो। 

मना अंतरीं सार विचार राहो॥४॥

यानंतरचा टप्पा म्हणजे मनाने शरीरातील सर्व अवयवांकडे म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत आणि पायापासून डोक्यापर्यंत  एकाच वेळी पहाण्यास शिकवतात. यावेळी शरीरात वेगळ्या प्रकारची उर्जा निर्माण होते. यालाच धारा प्रवाह म्हणतात. ही जाणीव होण्यासाठी थोडा कालावधी जावा लागतो.

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।

मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥ 

मना कल्पना ते नको वीषयांची। 

विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥५॥ 

या साधनेसाठी सर्वात दोन गोष्टी महत्वाच्या असतात त्या म्हणजे मौन आणि स्पर्श. या साधनेच्या दहा दिवसांच्या कालावधीत संपूर्ण मौन पाळणे आवश्यक असते. हे मौन कशासाठी तर मौन पाळल्यामुळे आपल्या मनामध्ये इतर कोणतेही विचार येऊ नयेत. त्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. दुसरे म्हणजे स्पर्श. म्हणजे या कालावधीत एकमेकांना स्पर्श वर्ज्य आहे. कारण ही साधना सुरु असताना आपल्या शरीरातील नकारात्मक विचार बाहेर पडत असतात. तसेच इतर साधकांच्या मनातील नकारात्मक विचार बाहेर पडतात. याचा आपल्या साधनेवर परिणाम होऊ नये म्हणून स्पर्श वर्ज्य आहे.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात मोबाईल, इंटरनेट, वाचन, लेखन यापासूनही अलिप्त  रहायचे असते. यामुळेच साधनेवर संपूर्ण लक्ष केंद्रित केले जाते.

या दहा दिवसांच्या कालावधीत दररोज पहाटे चार ते रात्री नऊ असा दिनक्रम ठरलेला असतो. पहाटे साडेचार ते साडेसहा , सकाळी आठ ते अकरा, दुपारी एक ते पा, सायंकाळी सहा ते सात आणि रात्री साडेआठ ते  नऊ या कालावधीत साधना, साधकांशी संवाद अर्थात प्रश्नोत्तरे,दररोज सायंकाळी सात ते  साडेआठ या काळात चित्रफीतीद्वारे पूज्य गोयंका गुरुजींची दररोजची प्रवचने ऐकवली जातात. या प्रवचनाद्वारे ही साधना पूर्ण करण्यासाठी बळ मिळते. सकाळी साडेसहा ते सात चहा, नाष्टा, सकाळी अकरा ते पावणेबारा जेवण, सायंकाळी पाच ते साडेपाच चहा, नाष्टा असे कार्यक्रम ठरलेले असतात.

या कालावधीत चहा, नाष्टा, जेवण यांच्या वेळा काटेकोरपणे पाळल्या जातात. त्यामुळे कोणत्याही आजारांना जवळ फिरकायला संधी मिळत नाही.नाष्टा आणि जेवण यांच्यामध्ये किमान पाच तासांचे अंतर ठेवले जाते. त्यामुळे पहिले सेवन केलेले अन्न संपूर्णपणे पचल्यानंतरच दुसरे अन्न सेवन केले जाते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या काळात संपूर्ण शाकाहारच करणे अपरिहार्य असते.

विपश्यना ही साधना गौतम बुद्धांनी सांगितली असली तरी यातील साधर्म्य बरेचसे आपल्या जुन्या परंपरा जपत असल्याचे जाणवते. कारण पुर्वीच्या काळातील परंपरा खरोखरच किती योग्य आहेत. हे प्रत्येक गोष्टीमधून आढळते.

नको रे मना क्रोध हा खेदकारी। 

नको रे मना काम नाना विकारी॥ 

नको रे मना लोभ हा अंगिकारू।

 नको रे मना मत्सरु दंभ भारु॥६॥ 

श्रीमत भगवत् गीता यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान, संत ज्ञानेश्वर महाराजांनी शिकवलेले तत्त्वज्ञान अथवा संत रामदास स्वामी यांनी मनाच्या श्लोकाद्वारे सांगितलेले तत्त्वज्ञान प्रत्यक्षात अनुभवण्याची कला म्हणजे विपश्यना आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही कला आत्मसात करुन आपल्या जीवनाचा उत्कर्ष साधावा.

फक्त एकदा शिकून भागणार नाही तर दररोजच्या जीवनात याचा अभ्यास केला पाहिजे. स्वतःचा ख-या अर्थाने विकास केला पाहिजे.

संपूर्ण जगावर प्रेम करता आलं पाहिजे. संपूर्ण जग सुंदर व्हायला पाहिजे. जगावर प्रेम करता आलं पाहिजे. नव्हे जगावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. जग खरंच किती सुंदर आहे हे अनुभवता आलं पाहिजे. ही तर खरी कला आहे आणि हेच जीवनाचं सार आहे. जीवन अनमोल आहे. ते भरभरून जगता आलं पाहिजे.

– श्रीमती उमा रुद्रभटे, फलटण.


Back to top button
Don`t copy text!