
दैनिक स्थैर्य | दि. २ सप्टेंबर २०२६ | फलटण |
फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्या मृत्यूप्रकरणी नातेवाईक, फडतरी (ता. माळशिरस) येथील ग्रामस्थ, धनगर समाजबांधव तसेच विविध घटकांतील सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. डॉ. रूपनवर यांना न्याय मिळावा, त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागण्यांसाठी मंगळवारी फलटण उपजिल्हा रुग्णालयावर मोर्चा काढून तब्बल दीड तास ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, डॉ. रूपनवर यांचा मृतदेह रुग्णालयासमोर ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या मृत्यूने फलटणमध्ये खळबळ उडाली आहे. मंगळवारी त्याचे पडसाद उमटले. डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्या सोलापूर जिल्ह्यातील फडतरी गावचे नागरिक आक्रमक झाले. त्यांनी फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयावर मोर्चा काढला. आंदोलनकर्त्यांची संख्या वाढल्याने उपजिल्हा रुग्णालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. रुग्णांना त्रास होऊ नये, यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापासून दूर राहण्याची विनंती केली.
या मोर्चात माळशिरस, पंढरपूर, फलटण, बारामती आदी भागांतून धनगर समाजबांधव तसेच विविध सामाजिक व स्थानिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. जसजसा दिवस पुढे सरकत गेला, तसतशी आंदोलनकर्त्यांची संख्या वाढत गेली. जिल्हास्तरावरून डॉ. जाधव यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथक फलटणमध्ये दाखल झाले. पथकाने रूपनवर यांच्या कुटुंबीयांशी तसेच आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. दिवसभर आंदोलनकर्त्यांनी संयमाने आपला संताप व्यक्त केला. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आंदोलन स्थगित केले.
एसआयटी चौकशी, फास्टट्रॅक न्यायालयाची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक अर्थात एसआयटीमार्फत चौकशी करावी आणि गुन्हा फास्टट्रॅक न्यायालयात चालवावा, अशी मागणी करण्यात आली. डॉ. रूपनवर यांनी लिहिल्याचे सांगितले जात असलेले पत्र (सुसाईड नोट) तसेच त्यांच्या मोबाईलमधील शेवटचा व्हिडीओ कुटुंबीयांच्या ताब्यात द्यावा. तसेच रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करून त्यामध्ये आढळणार्या संबंधित व्यक्तींची चौकशी करावी, अशीही मागणी करण्यात आली.
