
दैनिक स्थैर्य । 22 जून 2025 । कोळकी । माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे शब्द पाळणारा नेता म्हणून ओळखले जातात, त्याचा प्रत्येय नुकताच आम्हा कोळकीवासियांना आलेला आहे. पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे यांच्या समवेत आम्ही कोळकीचा पाणी प्रश्न मार्गी लागावा, या आग्रही भूमिकेवर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. प्रवेश केल्यानंतर काही महिन्यातच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विशेष मंजुरी घेत कोळकीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल 90 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे शब्द पाळणारा नेता आहेत, याचा प्रत्येय कोळकी वासियांना आला असल्याचे मत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य विकास नाळे यांनी व्यक्त केले आहे.
कोळकी गावासाठी पाणीपुरवठ्याची योजना मंजूर केल्याबद्दल ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य विकास नाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आभार मानले आहेत.
सदरील प्रसिद्धीपत्रकामध्ये नाळे म्हणाले आहेत की, पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे यांच्या समवेत आम्ही ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. प्रवेश करतेवेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोळकी गावाचा पाणी प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. सदरील आश्वासनानंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खास बाब म्हणून कोळकी गावच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी 90 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.
रणजितदादा नगरपंचायत सुद्धा नक्की करणार !; आता आम्हाला विश्वास
कोळकीचे स्वतंत्र अस्तित्व राहण्यासाठी व गावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी नगरपंचायत करण्यात येणार असल्याची ग्वाही अनेक नेते मंडळींनी दिली होती. वास्तविक पाहता कोळकी ग्रामपंचायत ठेवून नगरपंचायतीचा प्रस्ताव त्यावेळी पुढे पाठवण्यात आला नव्हता, परंतु आता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे कोळकी नगरपंचायत नक्की करतील !, असा विश्वास कोळकीवासियांना झालेला आहे. कोळकी नगरपंचायत करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आश्वासन दिले असून येणाऱ्या काही महिन्यांमध्ये कोळकी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झालेले आपल्या सर्वांना बघायला मिळणार असल्याचे मत सुद्धा विकास नाळे यांनी व्यक्त केले आहे.