प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर विकास काकडे सर उपमुख्याध्यापक पदावरून आज होणार सेवानिवृत्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विकास वसंतराव काकडे म्हणजेच आपले सर्वांचे विकास काकडे सर ३१ मार्च २०२४ ला आपल्या शैक्षणिक सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त…

वडील वसंतराव व आई प्रमिला या संस्कारीत दाम्पत्याच्या पोटी विकास काकडे सरांचा जन्म झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. दोन भाऊ व दोन बहिणी असा मोठ्या परिवारात ते जन्माला आले. विकास काकडे सरांना सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक गोष्टीची प्रचंड आवड असल्याने त्यांनी समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढावे तसेच तरुणांनी उच्च विद्याविभूषित होऊन आपला व आपल्या समाजाचा उद्धार करण्यासाठी आपला वेळ द्यावा, असा विचार कायम व्यक्त केला.

विकास काकडे सर यांनी १३ जानेवारी १९९६ ला नवचैतन्य हायस्कूल, गोंदवले या ठिकाणी आपल्या शैक्षणिक सेवेला सुरूवात केली. त्या ठिकाणी त्यांनी सहा वर्षे शिक्षक म्हणून सेवा केली. १७ जुलै २००२ ला ते ज्योतिर्लिंग हायस्कूल, आसू पवारवाडी या हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्या ठिकाणी शिक्षक म्हणून चार वर्षे सेवा केल्यानंतर १८ जुलै २००६ ला ते मुधोजी हायस्कूल फलटण येथे शिक्षक म्हणून दाखल झाले. १ जून २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत त्यांनी मालोजीराजे शेती विद्यालय व जुनिअर कॉलेज फलटण या ठिकाणी शिक्षक ते उपमुख्याध्यापक या पदावर आपल्या शैक्षणिक सेवेतील शेवटची सेवा केली. ते प्रदीर्घ सेवेनंतर ते ३१ मार्च २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.

हिंदी भाषेवर प्रभुत्व असलेल्या विकास काकडे सरांनी कला, क्रीडा, साहित्य व स्काऊट गाईडच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांना या कामासाठी हिंदी राष्ट्रभाषा, पुणे या संस्थेकडून ‘हिंदी प्रचार व प्रसार’ या कार्यासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ते महाराष्ट्र राज्य स्काऊट गाईड राज्यस्तरीय संघटक सदस्य म्हणून सध्या कार्यरत आहेत. निरंतर शिक्षण या विभागामध्ये त्यांनी विषयतज्ज्ञ म्हणून आपलं योगदान दिले आहे व देत आहेत.

काकडे सरांनी कायमच सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिले आहे. १९९१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले स्मृती शताब्दी वर्षांमध्ये फलटणच्या मुधोजी महाविद्यालयामध्ये शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या संयुक्त समितीच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन केले. यासाठी पुणे विद्यापीठाचे रजिस्टार नलवडे सर, मिलिंद महाविद्यालय औरंगाबादचे सोनकांबळे सर व अर्थतज्ज्ञ तथा ‘आमचा बाप आणि आम्ही’ या पुस्तकाचे लेखक नरेंद्र जाधव, ‘जिणं आमचं’ या आत्मचरित्राच्या लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या बेबीताई कांबळे यांनी आपले विचार व्यक्त केले. त्याचप्रमाणे मुधोजी महाविद्यालयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले यांच्या तैलचित्रांचं अनावरही यादरम्यान करण्यामध्ये विकास काकडे सरांचे योगदान महत्त्वाचे होते.

एका बाजूला फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विविध हायस्कूलमध्ये त्यांनी आपल्या हिंदी विषयाच्या माध्यमातून उत्कृष्ट पद्धतीने अध्यापन केले तर दुसर्‍या बाजूला सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक चळवळही गतिमान करण्याचे काम त्यांनी केले. बुद्ध वंदना व धम्म उपदेशनेचे कार्यक्रम आयोजित केले. पुणे येथील त्रैलोक्य बौद्ध महासभेच्या माध्यमातून श्रामनेर शिबिराचे आयोजनही त्यांनी फलटण या ठिकाणी केले. त्यांच्याच प्रेरणेने व सहभागाने महात्मा फुले कामगार वसाहतीमध्ये सहज क्रीडा मंडळाच्या वतीने उत्कृष्ट पद्धतीने क्रीडा संघ व स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यात आला. त्याचप्रमाणे १९९१ पासून बुद्ध जयंतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणे करण्याची सुरूवात त्यांच्याच सहभागाने सुरू झाली. हा बुद्ध जयंतीचा कार्यक्रम आजपर्यंत सुरू आहे. चांगले विद्यार्थी घडावेत, त्यांनी समाजाला दिशा द्यावी, हा विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. आपल्या प्रदीर्घ सेवेमध्ये त्यांनी वंचित, शोषित, उपेक्षित समाजातील मुलांसाठी कायमच मदतीचा हात दिला. त्यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या ज्या ज्या हायस्कूलमध्ये आपली शैक्षणिक सेवा दिली, त्या ठिकाणी आपल्या कार्याचा ठसा त्यांनी कायम उमटवला.

महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या प्रदीर्घ सेवेमध्ये वेगवेगळ्या जबाबदार्‍या समर्थपणे पार पाडल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी कायम त्यांनी आपला जादाचा वेळ दिला. अत्यंत स्पष्टोक्ते, हजरजबाबी, वास्तववादी, धम्मशील, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून कायम त्यांच्याकडे पाहिले जाते.

त्यांना लाभलेले मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांच्याशी त्यांनी कायम प्रेम, मैत्री, सलोखा राखून ऋणानुबंध जपले आहेत. अत्यंत तात्विक बैठक असलेल्या विकास काकडे सरांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक विद्यार्थी घडवले. आज ते विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या प्रदीर्घ सेवेमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपकराव चव्हाण यांनी कायमच त्यांच्यावर वरदहस्त ठेवला होता. त्याचप्रमाणे ज्या ज्या शाळांमध्ये त्यांनी काम केले, त्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांच्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली.

आपल्या या प्रदीर्घ सेवेमध्ये आपल्याला सर्व शिक्षक सहकार्‍यांची, कर्मचार्‍यांची, शिक्षक मित्र व फलटण एज्युकेशन सोसायटीचे सर्वच पदाधिकारी असा सर्वांचेच योगदान आपल्याला मिळाला असल्याचे ते आवर्जून सांगतात. त्यांच्या या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेतील सेवानिवृत्तीनंतर त्यांचे पुढील आयुष्य हे आरोग्यदायी, आनंददायी व उत्साहवर्धक जावो, हीच तथागताकडे प्रार्थना!


Back to top button
Don`t copy text!