फलटण शहराचे भूषण ‘इंगळे अण्णा’ अनंतात विलीन…

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण शहराचे भूषण, इंगळे, अष्टपुत्रे, अवलगावकर आणि वलसंगकर परिवाराचे आधारवड आणि सगळ्यांचे होते इंगळे अण्णा…

इंगळे अण्णांनी ‘ऐसे रसिका हसविन’ ह्या कार्यक्रमातून सातारा, सोलापूर, औरंगाबाद आणि पुणे, एवढेच काय लंडनमधील महाराष्ट्र मंडळात कार्यक्रम करून रसिकांची करमणूक करून ‘जीवन कसं जगावं’ ह्याचा संदेश दिला.

‘निवृत्तीनाथ आम्ही निवृत्तीनाथ’ पासून ते ‘आम्ही उरलो आता केवळ नंदादीप’ इथपर्यंत त्यांनी रसिकांची करमणूक केली.

कोठेही असोत अण्णा, त्यांच्या अवतीभवती कमीतकमी सात-आठ माणसे तरी असायची आणि सगळ्यांना ते काही सत्यकथा, काही संकलित केलेल्या कथा, विनोदी किस्से सांगून खिळवून ठेवत. त्यांच्या वयाच्या ९० व्या वर्षी पुण्यातील महावीर गार्डनमध्ये ‘ऐसे रसिका हसविन’ कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमास २०० पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. अजूनही माझे मित्र अण्णांची आठवण काढत असतात.

अण्णा विनोदी किस्से सांगण्याआधी सांगत असत की, खळखळून हसा, टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करा. उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे.

त्यांचा मित्रपरिवार तर खूप मोठा होता. रायते काका, इनामदार सर, शेंडे, वसंतराव मामा कोणा कोणाची नाव घेवू, हरिबाबाच्या मंदिरात न चुकता बरोबर सकाळी १०.३० वाजता त्यांची मित्रमंडळी अण्णांची वाट बघत बसलेली असायची.

सेवानिवृत्त झाल्यानंतर आयुष्य कसे जगले पाहिजे, हे इंगळे अण्णा ह्यांच्याकडून शिकले पाहिजे, असे त्यांचे मित्र सांगत. रिटायर झाल्यानंतर सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून कित्येक गरीब लोकांना त्यांनी हक्काची पेन्शन मिळवून दिली. ज्येष्ठ नागरिक संघ, फलटण शहराचे इंगळे अण्णा संस्थापक अध्यक्ष होते. फलटणमधील वृध्दाश्रम त्यांच्याच पुढाकारातून सुरू झाला. आपल्या आईच्या स्मरणार्थ ‘आदर्श माता’ पुरस्कार सुरू केला. सेवानिवृत्त संघटनेचे इंगळे अण्णा कित्येक वर्षे सचिव होते. म्हणूनच म्हणावेसे वाटते, इंगळे अण्णा फलटण शहराचे ‘भूषण’ होते.

त्यांच्या आठवणींचे काहूर माजले आहे. ते सगळ्यांनाच योग्य तो सल्ला देत, मार्गदर्शन करीत, शेतीसंबंधात असो, व्यवसाय, घरघुती स्वरूपात असो, मला तर त्यांनी शून्यातून उभे केले.

मला कायम म्हणायचे, विजयराव शेतीत जास्त पैसे घालू नका, आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत येईपर्यंत मी शेतीत लक्ष घातले नाही, पण ह्या तीन चार वर्षात शेतीत सुधारणा केल्या, अण्णांच्या कानावर सगळ्या गोष्टी घातल्या, त्यांना शेतातील फोटो दाखविले तेव्हा ‘मोठे बागायतदार’ झालात विजयराव, अशी त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाली.

तिन्ही मुलींचे, प्रदीपचे त्यांनी खूप लाड केले. जावयाचे पण काही कमी नाही, नातवंडे तर जीव की प्राण, सूनेला तर ‘श्री गोपालनाथांचा प्रसाद’ म्हणत.

कै. हरिकाका, किसनराव ह्यांचे अण्णा म्हणजे आदराचे स्थान आणि त्यांना अण्णांचा आधार वाटत असे. किसनराव तर १५ दिवसांतून एकदा भेटायला फलटणला यायचे. हरीकाका पण येत असत.

‘प्रपंच करावा नेटका’ ह्या समर्थ रामदास ह्यांच्या वचनाप्रमाणे संसार नेटका केला, पण ते संसारात अडकले नाहीत, हळूहळू लक्ष कमी करीत संपूर्ण जबाबदारी प्रदीपवर टाकली. त्यात पुन्हा लक्ष घातले नाही.

१५ दिवसांपूर्वी मी फलटणला आलो होतो, माझी ती शेवटची भेट, त्यांच्या भेटीमध्ये कायम आनंद असायचा. सर्वसाधारण मनुष्य थकला की कधी एकदा ह्या म्हातारपणातून सुटका होईल, असे म्हणत असतो; परंतु अण्णा म्हणाले की, मी सुखाचे वार्धक्य जगतो आहे, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन किती ‘पॉझिटीव्ह’ आहे.

प्रदीप आणि नीलिमा ह्या दोघांनी अण्णाचे वार्धक्य सुखमय केले. आज असे ऋषीतुल्य व्यक्तिमत्व अनंतात विलीन झाले.

अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली…


Back to top button
Don`t copy text!