दैनिक स्थैर्य | दि. ५ मे २०२३ | फलटण |
‘बुरूम, बुरूम’, ‘केळीवाली’, ‘हर हर महादेव’, ‘झुमकावाली पोरं’ आणि ‘चंद्रा’च्या ठसकेबाज लावणीच्या सुरात जि.प. प्राथमिक शाळा विद्यानगर, विडणी यांनी आयोजित केलेले ‘बहर २०२३’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी जोशात सादर केेलेल्या नृत्याविष्काराने सर्वांचीच मने जिंकली.
या कार्यक्रमास विडणीचे सरपंच सागर अभंग, ग्रा.पं. सदस्य सचिन अभंग, जयश्री शिंदे, विडणी सोसायटीचे संचालक सोनबा आदलिंगे, प्राथमिक शिक्षक बँकेचे व्हा.चेअरमन शशिकांत सोनवलकर, संचालक राजेंद्र बोराटे, दिलीप मुळीक, अनिल शिंदे, भोलचंद बरकडे, लक्ष्मण शिंदे, हिम्मत जगताप, तुकाराम कदम, निलेश कर्वे, धनाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अनिल शिंदे म्हणाले की, विद्यानगर शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी आज विविध क्षेत्रात कार्यरत राहून नाव कमविले आहे. या शाळेतून आजपर्यंत असंख्य विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व इतर स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. या विद्यार्थ्यांना घडविण्याबरोबरच त्यांच्या यशामध्ये मुख्याध्यापक रवींद्र परमाळे, वर्गशिक्षिका कोरडे मॅडम यांचे परिश्रम महत्त्वाचे आहेत. तसेच ग्रामस्थ, पालकांच्या सहकार्यामुळेच विद्यानगर शाळा आज प्रगतीपथावर आहे. सर्वांच्या सहकार्यातूनच सर्वांगीण विकास होत असतो. या ‘बहर २०२३’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना निश्चितच कौशल्य विकास व नृत्य कलेविषयी प्रेरणा मिळेल. भविष्यात या शाळेत असेच उज्ज्वल यश प्राप्त करावे, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शिक्षक संघाचे अनिल शिंदे व त्यांच्या सहकार्यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल मुख्याध्यापक रवींद्र परमाळे व वर्गशिक्षिका कोरडे मॅडम यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत सरपंच सागर अभंग यांनी केले. प्रास्ताविक परमाळे सर यांनी केले तर कोरडे मॅडम यांनी आभार मानले.
कार्यक्रमातील बालचमूंचा कलाविष्कार पाहण्यासाठी पालक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. कौतुकाच्या वर्षावात प्रत्येक नृत्यास गावकरी दाद देत होते.