
थेट WhatsApp वर मिळवा
विडणी गावात एका शासकीय कर्मचारी याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग समोर आले आहे. या प्रकारामुळे गावात तीव्र संताप व्यक्त होत असून कारवाईची मागणी होत आहे.
स्थैर्य, विडणी, दि. १५ ऑक्टोबर : विडणी (ता. फलटण) गावात एका शासकीय कर्मचाऱ्याने गावातीलच एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेचे ऑडिओ रेकॉर्डिंग सध्या चर्चेत असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पैशांचे आमिष आणि दबाव
समोर आलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये संबंधित कर्मचारी महिलेला पैशांचे आमिष दाखवून एकांतात भेटण्यासाठी दबाव टाकत असल्याचे स्पष्ट होत आहे. महिलेने त्याला स्पष्ट शब्दांत नकार देऊनही तो वारंवार असभ्य भाषेत मागणी करत असल्याचे ऐकायला मिळत आहे. गावातीलच महिलांशी अशा प्रकारे गैरवर्तन करणाऱ्या या कर्मचाऱ्याच्या कृतीमुळे ग्रामस्थांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.
कडक कारवाईची मागणी
समाजात अशा प्रकारच्या घटना वाढीस लागणे अत्यंत चिंताजनक आहे. संबंधिताने प्रतिष्ठेचा गैरवापर करून महिलेला त्रास देण्याचा केलेला हा प्रयत्न निंदनीय मानला जात आहे. प्रशासनाने आणि समाजाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अशा प्रवृत्तींवर कडक कारवाई करावी, जेणेकरून महिलांना सुरक्षित वातावरण मिळेल व अशा घटनांना आळा बसेल, अशी मागणी जोर धरू लागली आहे.





